पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. वातानुकूलित लोकलचे भाडेदर पुढील सहा महिन्यांपर्यंत ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. २४ डिसेंबर २०१८ पर्यंत भाडेदरात वाढ करण्यात येणार नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

२५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल गाडी धावली. सध्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली, विरारदरम्यान या लोकल गाडीच्या दिवसाला बारा फेऱ्या होत आहेत. पहिले सहा महिने सध्याच्या प्रथम श्रेणीच्या बेस फेअरच्या १.२ पट भाडे आकारण्यात येत आहे.

सहा महिन्यांनंतर या लोकलच्या भाडे दरांत १.३ पटीने वाढ करण्याचे प्रस्तावित होते. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडूनच निर्णय घेण्यात येणार होता. रेल्वे मंत्रालयाने सध्याचेच भाडे पुढील सहा महिन्यांपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

प्रवाशांकडून मिळत असलेला चांगला प्रतिसाद आणि उत्पन्न पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या लोकल गाडीमधून रेल्वेला आतापर्यंत सात कोटी रुपयांचे उत्पन्नही मिळाले आहे.