मुंबई : मुंबईकरांसाठीची दुसरी वातानुकूलित (एसी) लोकल चेन्नईतून विरार कारशेडमध्ये दाखल झाली असून तिच्या चाचण्या पश्चिम रेल्वे मार्गावर न करता मध्य रेल्वेमार्गावर करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवरही येत्या काळात एसी लोकल चालविण्याचे नियोजन असून घाट असलेल्या मार्गावर (कर्जत-कसारा) येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी मध्य रेल्वेवर ही चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार गाडीत बदल करण्यात येणार आहेत.

मुंबईतील पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहे. ही दुसरी लोकलही पश्चिम रेल्वेलाच मिळणार आहे. मध्य रेल्वेवर अद्याप एकही एसी लोकल सुरू करण्यात आलेली नाही.  मात्र, येत्या काळात या मार्गावरही एसी लोकल सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने या मार्गाचा अंदाज येण्यासाठी आता मध्य रेल्वेवर नव्या एसी लोकलच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेमार्गावर तिच्या चाचण्या झाल्यानंतर मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीस ती सेवेत आणण्यात येईल. या नव्या एसी गाडीची मोटार आणि इतर विद्युत उपकरणे गाडीच्या तळाला बसविण्यात आल्याने प्रवाशांना बसायला अधिक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे यापूर्वीच्या गाडीपेक्षा ३५० अधिक प्रवासी या लोकलमध्ये सामावू शकतील.