News Flash

‘एसी लोकल’ भाडय़ानेच घ्या!

बांधणीचा खर्च आवाक्याबाहेर जाण्याचा अंदाज

जागतिक बँकेची रेल्वे महामंडळाला सूचना; बांधणीचा खर्च आवाक्याबाहेर जाण्याचा अंदाज

खर्च वाचविण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ‘एमयूटीपी-३’ अंतर्गत येणाऱ्या ४७ वातानुकूलित लोकल गाडय़ा भाडेतत्त्वावर घ्या, अशी सूचना जागतिक बँकेकडून ‘एमआरव्हीसी’ला (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) करण्यात आली आहे. त्यामुळे ‘एमआरव्हीसी’कडून यावर अभ्यास केला जात आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली. बांधणी करण्यापेक्षा भाडेतत्त्वावर वातानुकूलित लोकल गाडय़ा घेतल्यास त्या स्वस्त आणि फायदेशीरही ठरतील, अशी अपेक्षा जागतिक बँकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

एमआरव्हीसीकडून एमयूटीपीअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध रेल्वे प्रकल्प राबविले जात आहेत. सध्याच्या घडीला एमयूटीपी-२ अंर्तगत रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू असून एमयूटीपी-३ आणि ३ ए मधील कामे येत्या काही महिन्यांत सुरू होतील. एमयूटीपी-३ अंतर्गत ४७ वातानुकूलित लोकल प्रकल्पाबरोबरच विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, २२ स्थानकांत दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडणे रोखणे यासह अन्य काही प्रकल्प असून त्याची एकूण किंमत १० हजार ९४७ कोटी रुपये आहे. २० डिसेंबर २०१६ रोजी एमयूटीपी-३ला मंजुरी मिळाली. फक्त ऐरोली ते कळवा लिंक रोडमधील दिघा स्थानकाच्या कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. प्रकल्पांच्या कामांना उशीर होत असतानाच त्यातच आता आणखी एक अडचण एमआरव्हीसीसमोर आली आहे. मुंबईकरांच्या सेवेत ४७ वातानुकूलित लोकल गाडय़ा आणल्या जाणार आहेत.

मात्र मेट्रो पद्धतीच्या वातानुकूलित लोकल गाडय़ा भाडेतत्त्वावरही घेऊन खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्याय बघा, अशी सूचना एमयूटीपी-३ला निधी पुरविणाऱ्या जागतिक बँकेने केली आहे.

ही सूचना केल्यानंतर एमआरव्हीसीकडून भाडेतत्त्वावर गाडय़ा घेणे किंवा त्यांची बांधणी करणे योग्य आहे याचा अभ्यास केला जात आहे. भाडेतत्त्वावर गाडय़ा घेतल्यास त्या परदेशातून घ्याव्या लागतील. त्यासाठीही खर्च येणार आहे.

सध्याच्या घडीला एमआरव्हीसीने ४७ वातानुकूलित लोकलसाठी ३ हजार ४९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.

मात्र हा खर्च लोकल गाडय़ांची बांधणीचा आहे. परंतु भाडेतत्त्वार घेतल्यास त्यापेक्षाही कमी खर्च होऊ शकतो आणि बांधणी करण्यापेक्षा भाडेतत्त्वावरील चांगल्या गाडय़ाही दाखल करू शकतो, असा पर्याय सुचविल्याचे एमआरव्हीसीतील सूत्रांनी सांगितले.

जागतिक बँकेच्या सूचनेचे महत्त्व

एमयूटीपीमधील प्रकल्पांना राज्य सरकार, रेल्वेबरोबरच जागतिक बँकेकडूनही निधी पुरविला जातो. त्यामुळे प्रकल्पांना निधी पुरविताना त्याची योग्यता, होणारा फायदा, खर्च इत्यादीची माहिती जागतिक बँक घेते आणि त्याप्रमाणे सूचना किंवा पर्याय सुचविते.

४७ वातानुकूलित लोकल गाडय़ा भाडेतत्त्वावर घेणे योग्य की त्यांची बांधणी करणे स्वस्तात राहील, यासाठी एमआरव्हीसीकडून अभ्यास सुरू आहे. जागतिक बँकेने दिलेल्या पर्यायाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. जर भाडेतत्त्वावरील वातानुकूलित लोकल गाडीचा पर्याय योग्य वाटल्यास त्याचा फायदा पुढेही होऊ शकतो.    – रवी शंकर खुराना, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:41 am

Web Title: ac local train world bank
Next Stories
1 ‘तुंबई’चा बोभाटा मुंबईला तोटय़ाचा!
2 सहा वर्षांत २९ हजार अग्निप्रसंग!
3 अंदाज.. वाटे खरा असावा!
Just Now!
X