मुंबई उपनगरीय स्थानकांसाठी ३७२ सरकते जिने; रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून स्थानकांची पाहणी

एल्फिन्स्टन रोड आणि करी रोड स्थानकात बनविण्यात येणाऱ्या नवीन पादचारी पुलांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल सोमवारी मुंबईत दाखल झाले. या दोन स्थानकांबरोबरच सीएसएमटी स्थानकाची पाहणी करत पश्चिम आणि मध्य रेल्वे अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. पादचारी पुलांची कामे वेगाने पूर्ण करा, अशी सूचना करत सुरू असलेल्या कामावर त्यांनी समाधानही व्यक्त केले. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणारी आणि पश्चिम रेल्वेवर १ जानेवारी २०१८ पासून सेवेत येणाऱ्या वातानुकूलित लोकलचा आढावा घेतला असता २५ डिसेंबरपासून लोकल चालविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रेल्वेकडून गोयल यांना देण्यात आली.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दुपारी चार वाजता एल्फिन्स्टन रोड स्थानकाला भेट देऊन रेल्वे आणि लष्कराकडून बांधल्या जाणाऱ्या दोन पुलांचा आढावा घेतला. यावेळी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्यासह रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. गोयल यांनी पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाला पादचारी पुलांची कामे वेगाने करा, अशी सूचना यावेळी केली. ट्रॅफिक ब्लॉकचे नियोजन करून त्यानुसार काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रवाशांना मात्र कोणताही त्रास होता कामा नये, असे स्पष्ट आदेशही गोयल यांनी उपस्थित दोन्ही महाव्यवस्थापकांना दिले. ट्रॅफिक ब्लॉकचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगत रेल्वेकडून गोयल यांना कामाची सविस्तर माहितीही दिली आणि त्यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दोन पुलांची कामे मुदतीआधीच पूर्ण होतील, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. एका खासगी मालकीच्या जागेमुळे करी रोड स्थानकातील पुलाच्या विस्तारकामाला थोडा विलंब होत असल्याचे सांगून त्याबाबत संबंधित मुंबई पालिकेशीही जमीन अधिग्रहणाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

आंबिवली स्थानकातील पुलाचे कामही वेळेत पूर्ण होईल, अशी आशादेखील गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. हे तीनही पूल लष्कराकडून बनविण्यात आल्यानंतर भारतीय रेल्वेतील १७ झोनमधील अधिकाऱ्यांना पूर्ण झालेले पूल आणि त्याचे काम दाखविण्यात येणार आहे. लष्कराकडे पूल बनविण्यासाठी ज्याप्रमाणे तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्यात जसे नियोजन करण्याची पद्धत आहे तशीच पद्धत रेल्वेतही आणण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले.

सरकते जिने

देशभरातील रेल्वे स्थानकांवर तीन हजारांपेक्षा जास्त सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. यात मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये ३७२ जिन्यांचा समावेश असल्याचे गोयल यांनी सांगितले. त्याचबरोबर सीसीटीव्हींचे जाळे वाढवण्यावरही भर दिला जात आहे. तसेच स्थानकातील फलाटांची उंची वाढविण्याची कामेही गतीने सुरू असल्याचे ते म्हणाले.

धीम्या लोकलने प्रवास

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील नवीन पादचारी पुलाची पाहणी केल्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी करी रोड स्थानकात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाजूलाच असणाऱ्या परळ स्थानकातून सीएसएमटीला जाणारी धीमी लोकल पकडली. करी रोड स्थानकात पूल बनला असून त्याचा विस्तार पूर्व दिशेला केला जाणार आहे. या कामाचा आढावा घेतल्यानंतर करी रोड स्थानकातून पुन्हा सीएसएमटीला जाणारी धीमी लोकल पकडली आणि प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला. त्यानंतर सीएसएमटी स्थानकाचीही पाहणी करताना या स्थानकात नवीन पूल तसेच अन्य काही सुविधांवर चर्चा केली. या स्थानकातील हार्बर फलाटांसमोरील स्टार चेंबर्सलाही भेट दिली.

अडथळ्याच्या तिकीट खिडक्यांचाही आढावा

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलांवर असलेल्या आणि प्रवाशांना अडथळा ठरणाऱ्या तिकीट खिडक्यांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात आल्या.