सांताक्रूझ कालिना येथील राज्य ग्रंथालयाची इमारत बांधून देण्याच्या मोबदल्यात मोक्याचा भूखंड ‘इंडिया बुल्स’ला देण्याच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढत माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविल्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ‘छगन भुजबळ वेल्फेअर ट्रस्ट’मार्फत नाशिकमध्ये झालेल्या फेस्टिवलमधील इंडिया बुल्सचा नेमका सहभागही तपासला जाणार आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.
नाशिक फेस्टिवलचे प्रायोजकत्व इंडिया बुल्सने स्वीकारले होते. या फेस्टिवलमध्ये अनेक तारकांनी आपली कला सादर केली. यापोटी त्यांनी सुमारे एक कोटीपर्यंत मानधन स्वीकारले, अशी आमची माहिती आहे. मानधन तसेच या तारकांचा राहण्याचा आणि प्रवासाचा खर्चही इंडिया बुल्सने केला असावा, असा संशय आहे. त्यामुळे नाशिक फेस्टिवलच्या निमित्ताने इंडिया बुल्सने नेमका किती खर्च केला हेही तपासले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘इंडिया बुल्स’ या फेस्टिवलचे प्रायोजक होते. सदर ट्रस्टला इंडिया बुल्सने दिलेली अडीच कोटींची देणगी ही लाचेचाच प्रकार असल्याचा निष्कर्षही एसीबीने काढला आहे.
कालिना येथील राज्य ग्रंथालयाची इमारत बांधण्याच्या मोबदल्यात इंडिया बुल्सला सुमारे सात हजार चौरस मीटर इतका भूखंड निवासी, तसेच अनिवासी वापरासाठी दिला गेला. एक रुपया प्रति चौरस मीटर दराने ९९ वर्षांसाठी हा भूखंड इंडिया बुल्सला देताना भूखंड विषयक वितरणातील अटी व शर्तीचा भंग करण्यात आला. त्यामुळे हा भूखंड शासनाने परत घ्यावा, असे आदेशही उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत हा भूखंड इंडिया बुल्सला देण्यात आला. याच काळात भुजबळ अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला अडीच कोटींची देणगी म्हणजे लाचेचाच प्रकार असल्याचे या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्य़ात एसीबीने म्हटले आहे. अडीच कोटी रुपयांव्यतिरिक्त इंडिया बुल्सने आणखी किती मदत केली, याची तपासणी केली जाणार असल्याचेही दीक्षित यांनी सांगितले.
या संदर्भात ‘इंडिया बुल्स’ या कंपनीशी संपर्क साधला असता मुख्य अधिकारी गगन बांगा यांच्या स्वीय सहायकांनी मार्केटिंग विभागाचे राहत अहमद यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. राहत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या संदर्भात कंपनीने अधिकृतपणे काहीही प्रसिद्धीसाठी दिलेले नाही. मात्र याबाबत विशिष्ट प्रशेनावली पाठविल्यास त्याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल.