20 September 2020

News Flash

सुनील तटकरे अडचणीत; कोंडाणे धरण घोटाळा प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल

आरोपपत्रामध्ये सहा अधिका-यांच्या नावाचाही समावेश आहे.

सुनील तटकरे

रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळा प्रकरणी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपत्रात माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे नाव असल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लवकरच या प्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. एसीबीने दाखल केलेल्या या तीन हजार पानांच्या आरोपपत्रामध्ये सहा अधिका-यांच्या नावाचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरण प्रकल्पात अनियमितता झाली आहे. प्रकल्पाच्या मूळ किंमतीत भरमसाट वाढ झाल्यानंतर या प्रकल्पाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. भाजप नेते विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यात भाजपची सत्ता आल्यास जलसिंचन घोटाळ्यातील सर्व दोषींना तुरुंगात धाडू, असे म्हटले होते. त्यामुळे भाजपने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, गेल्या वर्षांमध्ये कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.

कोकण पाटबंधारे विभागाने १९ मे २०११ रोजी रायगड जिल्ह्य़ातील कर्जत येथे उल्हास नदीवर कोंडाणे धरण बांधण्यास मान्यता दिली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यातील अटी-शर्तीकडे डोळेझाक करून तातडीने निविदा मागविल्या. त्यात एफ. ए. कन्स्ट्रक्शन आणि एफ. ए. एन्टरप्रायजेस या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपन्या प्रत्यक्षात एकच होत्या. शिवाय निविदेतील अटी-शर्तीची पूर्तता केलेली नसतानाही त्यातील एफ.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले. इतकेच नव्हे तर शासनाकडून सुधारित मान्यता न घेता याच कंपनीला वाढीव २७१ कोटींचा ठेका देण्यात आला. या प्रकरणी जलसंपदा विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक डी. पी. शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बा. भा. पाटील, पाटबंधारे खात्याच्या ठाणे विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता आर. डी. शिंदे, जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता प्र. भा. सोनावणे, रायगड पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अ. पा. साळुंके, कार्यकारी अभियंता रा. चं. रिठे आणि एफ. ए. एन्टरप्रायजेसचा भागीदार निसार खत्री यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2017 5:05 pm

Web Title: acb registers chargesheet for kondane dam scam ncp sunil tatkare may face difficulties
Next Stories
1 मुंबईतील १३ वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीच्या बाळाचा दोन दिवसांतच मृत्यू
2 राज्याला स्वाइन फ्लूचा विळखा
3 राज्यात वर्षभरात १४,३६८ बालमृत्यू!
Just Now!
X