संदीप आचार्य-निशांत सरवणकर

पायाभूत सुविधांसोबत गृहनिर्माण क्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेमुळे नव्या वर्षांत बांधकाम उद्योगाला गती मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया विकासकांच्या प्रमुख संघटनांसह काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

नव्या वर्षांत निवासी आणि अनिवासी घरांच्या संख्येत साडेसहा टक्क्य़ांची वाढ अपेक्षित असल्याचे ‘फिट्च सोल्युशन्स’ने ३० डिसेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. त्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधीची घोषणा केल्यानंतर विकासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ‘नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलनमेंट कौन्सिल’चे (नरेडको) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी या घोषणेचे स्वागत करताना म्हटले आहे की, रस्ते उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या भोवती गृहप्रकल्प राबविणाऱ्या विकासकांना त्याचा फायदा होणार आहे. ग्राहकांची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे साहजिकत त्यामुळे बांधकाम उद्योगात सकारात्मकता दिसून येईल. बांधकाम उद्योगाला आता निधी उपलब्ध होत असून हे वर्ष या उद्योगासाठी फायदेशीर आहे.

‘प्लॅटिनम कॉर्प’चे विशाल रतनघायरा यांनीही केंद्र शासनाच्या भूमिकेचे स्वागत करताना म्हटले आहे की, या निर्णयामुळे बांधकाम उद्योगासह ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. निधी उपलब्ध झाल्याने बांधकामात खंड पडलेला नाही. त्यामुळे ग्राहकही पुढे येत आहेत. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेमुळे या उद्योगाबद्दल अधिक विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होणार आहे. ‘नरेडको’चे उपाध्यक्ष रोहित पोद्दार, ‘एकता वर्ल्ड’चे अशोक मोहनानी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले.

‘गृहप्रकल्पांना फायदा’ : पायाभूत सुविधांना भरघोस पाठबळ मिळाल्यामुळे साहजिकच त्याचा फायदा गृहप्रकल्पांनाही होणार आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास घर खरेदीदार वाढतात, याकडे ‘नाईट फ्रँक’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी लक्ष वेधले आहे. मंदीत असलेल्या बांधकाम उद्योगाला मोठय़ा प्रमाणात निधीची गरज होती आणि ती मागणी पूर्ण झाली आहे, अशी प्रतिक्रिया ‘नहार समुहा’च्या मंजू याज्ञिक यांनी दिली आहे. मुंबई, ठाणे व पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमधील बांधकाम व्यवसाय आता गती घेईल असे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.