मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याच्यादृष्टीने या जागेचा बृहत आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए)  तयार केला जाणार आहे. त्यानुसार या जागेचे सव्र्हेक्षण आणि अभ्यास करत बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी अखेर मंगळवारी निविदा मागवली आहे.

२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे म्हणत केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात अधिकाधिक परवडणारी घरे बांधण्यासाठी मिठागरांच्या जागेचा पर्याय पुढे आणण्यात आला. त्यानुसार २०१४ मध्ये मिठागरांच्या जागेचा विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे.  नगरविकास, पर्यावरण विभाग, गृहनिर्माण विभाग आणि महापालिकेच्या सहकार्याने मिठागरांच्या जमिनीचा बृहत आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही एमएमआरडीएवर टाकण्यात आली आहे. तेव्हा मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मिठागरांच्या जमिनी किती आहेत, कुठे आहेत, किती जमिन सीआरझेडखाली आणि किती जमीन विकासासाठी उपलब्ध होईल या सर्व बाबींचा अभ्यास आधी एमएमआरडीएकडून केला जाणार आहे. त्यानुसार मिठागरांच्या जागेचे सव्र्हेक्षण करत अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठीच निविदा मागवण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

बृहत आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी याआधीही निविदा मागवण्यात आली होती. पण त्यावेळी एकच निविदा सादर झाल्याने ती निविदा रद्द करण्यात आली. तर आता पुन्हा सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागवण्यात आल्याचेही  अधिकाऱ्याने सांगितले आहे.