ठाणे रेल्वे स्थानकातील सोमवारी रात्रीची घटना; प्रशासनावर चालक शोधण्याची वेळ
रेल्वे स्थानकात अपघात घडल्यास अपघातग्रस्त प्रवाशाला रुग्णालयात पोहचवून त्याला तात्काळ उपचार देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे प्रशासनाला दिले असले तरी रुग्णवाहिकेचा चालक उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्राण गमवावे लागले. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ठाणे स्थानकात एका २९ वर्षीय तरुणाला लोकलची धडक बसली. मात्र त्याला रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिकेचे चालक उपलब्ध नसल्याने रेल्वे प्रशासनाला चालक शोधण्याची वेळ येऊन ठेपली होती. स्थानक व्यवस्थापकांकडून चालकाला कार्यालयात पोहचण्याची दहा ते पंधरा वेळा उद्घोषणा करावी लागत होती. त्यानंतर त्या अपघातग्रस्त व्यक्तीस रुग्णालयात पोहचवण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
रेल्वे रूळांलगत संरक्षण भिंतीचे अपुरे काम आणि पादचारी पुलांच्या कमतरतेमुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असून अपघाताचे बळी ठरत आहेत. सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भीमनगर परिसरातील साईनगर चाळीमध्ये राहणारा नितीन कांबळे (२९) हा तरुण रूळ ओलांडत असताना गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त नितीनला रेल्वे पोलीसांनी ट्रेचरवरून स्थानकात आणले मात्र त्याचवेळी रुग्णवाहिकाचा चालक उपलब्ध नसल्याने स्थानक व्यवस्थापकांसमोर पेच निर्माण झाला होता.

दिवा स्थानकातील अपघातात तरुणीचा मृत्यू
सोमवारी सकाळी दिवा स्थानकाजवळ एका ३२ वर्षीय तरुणीचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. मंदा कासले (३२) असे या तरुणीचे नाव असून ती दिव्यातील शिवमंदिर परिसरातील मोरेश्वर अपार्टमेंट येथे राहत होती. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडताना अचानक आलेल्या लोकलच्या धडकेत ती गंभीर जखमी झाली. तिला ठाण्यातील जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

चालक पूर्णवेळ जखमी सोबत होता मात्र उद्घोषकाला याची कल्पना नसल्याने स्थानकात दहा ते १५ वेळा चालकाला उपस्थित राहण्याची उद्घोषणा सुरू होती.
– एस. बी. महिधर, ठाणे स्थानक व्यवस्थापक