कुर्ल्यातील दुर्घटना; जीवितहानी टळली

चेंबूर-सांताक्रुझ लिंक रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना कुर्ला येथे एका वाहनावर लोखंडी गजांचा मोठा खांब पडून शुक्रवारी मोठा अपघात झाला. सुदैवाने यात कुणी दगावले नाही. दुपारी पावणेदोनच्या सुमारास झालेल्या या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले.

नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून येणाऱ्या वाहनांना तत्काळ वांद्रे कुला संकुल आणि विमानतळ परिसरात जाता यावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून चेंबूर-सांताक्रुझ लिंक रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे काम एमएमआरडीएकडून जोरात सुरू आहे. सध्या कुर्ला पश्चिम येथे रस्त्याच्या मधोमध खांब उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी लोखंडी गज उभे करून खांब बांधण्यात येत आहेत. शुक्रवारी दुपारी देखील येथील कपाडियानगर परिसरात अशाच प्रकारे काम सुरू होते. अचानक एका कारवर लोखंडी गजांचा खांब कोसळला. यावेळी या वाहनात एक चालक बसलेला होता. सुदैवाने तो यातून वाचला. त्याला साधा ओरखडाही आला नाही. मात्र यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

चेंबूर-सांताक्रुझ लिंक रोड हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. त्यातच शुक्रवार असल्याने येथील बहुतांश दुकानदार आणि कामगार नमाज पढण्यासाठी गेले होते. या रस्त्यावर वाहनांची संख्याही कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली.