सुक्या माशांची वाहतूक करणाऱ्या बोटीला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मढ येथे अपघात झाला. मढ येथून ही बोट वर्सोव्याच्या दिशेने निघाली होती. या बोटीत एकूण सातजण होते. त्यापैकी चारजणांना पोहता येत असल्याने त्यांनी आपला बचाव करत किनारा गाठला. परंतु बोटीतील तीनजन अद्याप बेपत्ता आहेत. वाऱ्याचा वेग आणि क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टाळेबंदीमुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्याने वर्सोवा ते मढ या कमी अंतर असलेल्या दोन किनाऱ्यांलागत चालणारी सागरी वाहतूकही बंद आहे. त्यामुळे आकाराने लहान असलेली खासगी बोट घेऊन काही कामगार सुके मासे गोदामात ठेवण्याच्या निमित्ताने मढ येथे गेले. माल गोदामात ठेऊन वर्सोव्याच्या दिशेने परतत असताना या बोटीचा तोल जाऊन बोट उलटली. बोटीत असलेल्या सात जणांपैकी चारजण पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचले, परंतु तिघांचा मात्र अद्याप शोध लागला नाही. नाझीर अहमद (५९ वर्षे), मो. युसुफ उस्मान (४४ वर्षे), मो. सादिक उस्मानी (५६ वर्षे)  अशी या तिघांचे नावे असून हे सर्व वर्सोवा येथे राहणारे आहेत. वाऱ्याचा वेग आणि क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने बोट उलटल्याचे स्थानिक  पोलिसांनी सांगितले.