कोकणात निघालेल्या इनोव्हा कारला मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीत जिल्ह्यात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. गाडी वेगाने पळत असताना अचानक इनोव्हा कारचा टायर फुटल्यामुळे चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत १२ वर्षाच्या मुलासह गाडीतील चारजण बेपत्ता झाले आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावात ही दुर्घटना घडली. स्थानिक गावकऱ्यांनी मोठया प्रयत्नाने चालकाला वाचवले. हा अपघात झाला तेव्हा मोठा आवाज झाला. मागच्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.

इनोव्हा नदीपात्रात कोसळली तेव्हा पाण्याला प्रचंड वेग होता. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून शोध आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी म्हाडामध्ये रात्रीच्या वेळी सावित्री नदीवरील पूल कोसळला होता. या दुर्घटनेत पूलावरुन जाणारी एक एसटी बस सावित्री नदीत वाहून गेली होती. त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पुढचे काही दिवस कोकणातल्या वेगवेगळया समुद्र किनाऱ्यांवर मृतदेह सापडले होते.