मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी पुन्हा एकदा दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेली पहायला मिळाली. महामार्गावरील खंडाळ्याच्या बोगद्यापासून साधारण १०० मीटर अंतरावर हा प्रकार घडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावरील मुंबईच्या दिशेने येणारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात असले तरी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. तत्पूर्वी शनिवारी सकाळीदेखील सव्वादाहाच्या सुमारास महामार्गावरील कामशेत बोगद्यात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला होता. त्यामुळे सकाळच्या वेळेत महामार्गावरील  वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. यापूर्वी द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोगदा व आडोशी बोगदा या दोन ठिकाणी अनुक्रमे २२ जून व १९ जुलै रोजी मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन मुंबई व पुणे या शहरांचा संपर्क तुटला  होता. आडोशी बोगद्याजवळ कोसळलेल्या दरडीमध्ये २ जण ठार व ३ जण जखमी झाले होते.