मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काल मध्यरात्री दोन बसगाड्यांचा अपघात झाल्याची दुर्घटना घडली. द्रुतगती मार्गावरील शिरगावनजीक हा अपघात झाला. यावेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका खासगी बसने एसटीला धडक दिली. या अपघातात एसटीतील एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून अन्य सात ते आठ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांचे हाल; टोलनाक्याजवळ ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा
सुट्टी संपवून रस्तेमार्गे मुंबईकडे परतणाऱ्या पर्यटकांना सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सव आणि पर्यटनानिमित्त मुंबईबाहेर गेलेले अनेकजण एकाचवेळी शहरात परतत असल्याने रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सध्या मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या वाशी आणि खारघर या टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे.

 दक्षिणेतून मुंबईत येणाऱ्या रेल्वे हाऊसफुल्ल, कोकणातील प्रवाशांचे हाल
गणपती आणि गौरीचे विसर्जन करून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेच्या स्थानकांवर मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दक्षिणेकडून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने कोकणातील प्रवाशांना गाडीत चढायला मिळत नाही. गर्दीमुळे गाडीच्या आतील प्रवासी अनेक स्थानकांवर गाडीच्या डब्यांचे दरवाजे उघडत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या स्थानकांवर हा प्रकार पाहायला मिळत आहे.