मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी बंदोबस्तासाठी तैनात

मुंबई : उद्योगपतीमुकेश अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टीलीया’ या निवासस्थानी बंदोबस्तावर तैनात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान देवदन रामभाई बकोत्रा (३०) यांचा बुधवारी मध्यरात्री अपघाती मृत्यू झाला. सोबत बाळगलेल्या अद्ययावत रायफलमधून अपघाताने सुटलेली गोळी लागून देवदन गंभीर जखमी झाले होते.

पेडर रोड येथील ‘अ‍ॅन्टीलीया’ या अंबानी यांच्या निवासस्थानाभोवती स्थानिक पोलीस, ‘सीआरपीएफ’ची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी इमारतीच्या मागील बाजूस देवदन तैनात होते. त्यांच्याजवळची अद्ययावत रायफल होती. रायफल खांद्यावरून बाजूला करताना खाली पडली आणि त्यातून दोन गोळ्या सुटल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या पोटात लागली. गोळीबाराचा आवाज ऐकून बंदोबस्तावरील स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी देवदन यांना जसलोक रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचे पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले.

सुरुवातीला देवदन यांनी आत्महत्या केल्याचा संशय होता. मात्र सीसीटीव्ही चित्रण पाहिल्यावर अपघाताने गोळी सुटून देवदन यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज गावदेवी पोलिसांनी काढला.