मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वेगाने दुचाकी चालवणे एका तरूणाच्या जीवावर बेतले आहे. महामार्गावरून महागड्या दुचाकीवरून मुंबई ते गुजरात असा प्रवास करत असताना, दुचाकीचे नियंत्रण सुटून घडलेल्या अपघातात या तरूणाचा मृत्यू  झाला. प्रतिक कोटियन असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

मुंबईत राहणाऱ्या सहा तरूणांनी रविवारी मुंबई ते अहमदाबाद महामार्गवरून गुजरातला दुचाकीने जाण्याचा बेत आखला होता. या तरुणांमध्ये माटुंग्यात राहणाऱ्या प्रतिक कोटियन (३१) याचाही समावेश होता. रविवारी सकाळी ठरल्याप्रमाणे आपल्या सहा मित्रांसह प्रतिक मुंबईहून गुजरातच्या दिशेला असलेल्या चारोटी येथील आहुरा हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाला होता. प्रतिककडे अत्याधुनिक व अतिशय वेगाने धावणारी दुचाकी होती. रविवार असल्याने रस्ता मोकळाच होता. त्यामुळे प्रतिकच्या दुचाकीचा वेगही वाढलेला होता. दरम्यान, विरार जवळील खानिवडे टोल नाक्याच्या अलीकडे त्याचे अचानक बाईकवरचे नियंत्रण सुटले व दुचाकी महामार्गावरील दुभाजकाला जाऊन धडकल्याने प्रतिक दुचाकीवरून फेकला गेला.

या अपघातात प्रतिक गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या मित्रांनी आसपासच्या ग्रामस्थांच्या सहाय्याने त्याला टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेतून जवळील रूग्णालयात नेले. मात्र, तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची  नोंद कऱण्यात आली आहे.