अपघातात एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते वा एखाद्याचा मृत्यूही होतो. अपघाताची कायदेशीर व्याख्याही हीच बाब ठळकपणे अधोरेखित करते. त्याचमुळे अचानकपणे, अनपेक्षितरीत्या आणि हिंसेद्वारे होणारी दुखापत वा मृत्यू मग तो खून असला तरी तो अपघाती मृत्यूच आहे. उष्माघात, कडाक्याच्या थंडीमुळे झालेला मृत्यू, सर्पदंश, श्वानदंश, मलेरिया वा डेंग्यू होऊन झालेला मृत्यूही अपघाती मृत्यूच्या व्याखेत मोडतात..

बुधन प्रसाद यांनी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स या कंपनीकडून स्वत:साठी अपघात विमा योजना घेतली होती. त्यांना या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेता येणार होता. त्यांनी घेतलेल्या योजनेची वैधता ही ३१ मार्च २००५ ते ३० मार्च २०१० अशी पाच वर्षांपर्यंतची होती. या कालावधीदरम्यान म्हणजेच १ जून २००८ रोजी त्यांचा खून झाला. या दु:खातून सावरल्यानंतर बुधन यांचा मुलगा राजकिशोर प्रसाद याने कंपनीकडे विम्याच्या रकमेसाठी दावा केला होता. परंतु कंपनीकडून त्याचा दावा फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे राजकिशोर याने जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचाकडे धाव घेत कंपनीच्या विरोधात तक्रार नोंदवली. कंपनीनेही तक्रारीला उत्तर देताना बुधन यांचा अपघाती मृत्यू झालेला नाही तर त्यांचा खून करण्यात आला होता ही बाब मंचाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळेच राजकिशोर हा विम्यासाठी पात्र नाही आणि त्याने केलेला दावा फेटाळण्याचा आपला निर्णय योग्य होता, असे मंचाला पटवून देत निर्णयाचे समर्थन केले. मंचानेही कंपनीचे म्हणणे योग्य ठरवत राजकिशोर याची तक्रार फेटाळून लावली. मंचाच्या या निर्णयाला राजकिशोर याने नंतर राज्य ग्राहक वाद निवारण आयोगात आव्हान दिले. त्याने केलेले अपील आयोगाने दाखल करून घेतले आणि जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचाचा आदेश रद्दबातल ठरवला. तसेच बुधान यांच्या मुलाला अपघात विम्याचे पैसे देण्यास कंपनी बांधील असल्याचा निर्वाळा दिला. एवढेच नव्हे, तर राजकिशोर याला विम्याची एक लाख रुपयांची रक्कम ही सहा टक्के व्याजाने द्यावी, असे आदेशही आयोगाने दिले. त्याशिवाय नुकसान भरपाई म्हणून १० हजार रुपये व कायदेशीर लढय़ासाठीच्या खर्चाचे पाच हजार रुपयेही राजकिशोर याला कंपनीने द्यावेत, असेही आयोगाने कंपनीला बजावले.

राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचा हा निकाल न पटल्याने आणि आदेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत कंपनीने त्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाकडे धाव घेतली. कंपनीच्या अपिलावर सुनावणी घेताना बुधन यांच्या मृत्यूला अपघाती म्हणावे की नाही? हाच मुख्य प्रश्न राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगासमोर होता. बुधन यांच्या मृत्युप्रकरणी दाखल गुन्’ाानुसार बुधन हे त्यांची विवाहित मुलगी सुशीलादेवी हिच्या घरी गेले होते आणि तिथेच त्यांची हत्या करण्यात आली. सुशीलादेवी आणि बुधन हे दोघेही घराच्या गच्चीवर झोपलेले होते. त्या वेळी हल्लेखोरांनी दोघांवर गोळ्या झाडून त्यांचा खून केला. सुशीलादेवी हिच्यासह एकावर खुनाच्या आरोपाखाली खटला सुरू होता. त्यातून आपली निर्दोष सुटका व्हावी म्हणून सुशीलादेवी आणि तिच्या साथीदाराने खटल्यातील साक्षीदारांना साक्ष देण्यापासून दूर ठेवण्यासाठी गुंडांची मदत घेतली. या गुंडांकरवी त्यांनी साक्षीदारांना धमकावले होते. परिणामी जिवाच्या भीतीने साक्षीदार साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर झालेच नाहीत. मात्र काम करूनही कामाचे पैसे सुशीलादेवी हिने दिले नाहीत म्हणून हल्लेखोर आणि तिच्यात वाद झाला. त्याचा सूड उगवण्यासाठी हल्लेखोरांनी तिच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार घटनेच्या दिवशी हल्लेखोरांनी तिच्या घराच्या गच्चीवर जाऊन गाढ झोपेत असलेल्या सुशीलादेवी हिच्यावर गोळ्या झाडल्या. त्या वेळी बुधन हेही गच्चीवरच झोपलेले होते आणि हल्लेखोरांनी सुशीलादेवी हिच्यावर केलेल्या गोळीबारात त्यांचाही मृत्यू झाला.

त्यामुळेच बुधन यांचा मृत्यू हा अपघात होता की खून, या प्रश्नाचे उत्तर शोधताना राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने रितादेवी विरुद्ध न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा प्रामुख्याने आधार घेतला. अपघात कशाला म्हणावा? याचा अर्थ वा व्याख्या या निकालात स्पष्ट करण्यात आलेली आहे. कुठल्याही खुनामागचे ठोस कारण स्पष्ट होतेच असे नाही. परंतु खुनामागचे ठोस कारण स्पष्ट झाल्यानंतरच एखाद्याचा मृत्यू अपघाती आहे की नाही हे ठरवण्यात यावे वा निश्चित केले जावे, असे निकालात म्हटले आहे. याच व्याख्येचा आधार घेत आयोगाने बुधन प्रकरणाचा निकाल त्याच्या मुलाच्या बाजूने दिला. हल्लेखोर हे बुधनचा नाही तर सुशीलादेवीचा खून करण्यासाठी आले होते हे चौकशीतून उघड झालेले आहे. दुर्दैव एवढेच की सुशीलादेवीचा खून झाला त्या वेळी बुधनही तेथे होता आणि हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळेच बुधानचा खून जरी झाला असला तरी त्याचा मृत्यू हा अपघाती होता, असा निर्वाळा आयोगाने दिला. त्याचप्रमाणे राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाने याप्रकरणी दिलेला निकाल आणि बुधनच्या मुलाला विम्याची रक्कम देण्याबाबत दिलेला आदेशही योग्य होता, असे स्पष्ट करत राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने कंपनीचे अपील फेटाळून लावले. या निकालाद्वारे अचानक, आकस्मिक आणि हिंसेतून एखाद्याचा मृत्यू झाला असला तरी तो अपघाती मृत्यूच आहे हे आयोगाने ग्राह्य  मानले आहे आणि त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीत काम करणे, उदाहरणार्थ बर्फाळ पाण्यात काम करणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच उष्पाघात, आजारपण एवढेच नव्हे, तर अनैसर्गिक मृत्यू हे अपघाती मृत्यूच आहेत, हेही स्पष्ट केले आहे.