कुतूहलापोटी आपल्या सहकाऱ्याची रायफल बघत असताना चुकून गोळी सुटली आणि मोठा गोंधळ उडाला. महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याकडून शनिवारी संध्याकाळी ही चूक घडली. या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली.
वांद्रेच्या बीकेसी येथील सेबी भवनाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाचे संरक्षण आहे. दोन सुरक्षारक्षक तेथे बंदोबस्तासाठी तैनात होते. शनिवारी संध्याकाळी मुख्य सुरक्षारक्षक ढवळे ध्वज खाली उतरवत होते. त्या वेळी त्यांनी आपल्याकडील पॉइंट ३०३ ची रायफल खाली ठेवली होती. त्या वेळी त्याचा सहकारी सुरक्षारक्षक किरण घुगेने ती रायफल कुतूहलापोटी बघायला घेतली. मात्र त्याला रायफल चालविण्याचे प्रशिक्षण नसल्याने रायफलीतून एक गोळी सुटली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या प्रकरणाची माहिती मंडळाच्या वरिष्ठांना देण्यात आली. बीकेसी पोलीस ठाण्याने किरण घुगे याला जीवितास हानी निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सोमवारी अटक केली. न्यायालयाने नंतर त्याची जामिनावर सुटका केली. राज्य सुरक्षा बलाची स्थापना २०१० साली करण्यात आली असून विविध सरकारी आस्थापनांना त्यामार्फत सुरक्षा पुरवली जात असते.