दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा
बेदरकारपणे दुचाकी चालवणे, हेल्मेट परिधान न करणे, एका दुचाकीवर दोनपेक्षा अधिक प्रवाशांनी वाहतूक करणे, अशा नियमभंगांमुळेच दुचाकीस्वारांचे अपघात होतात, या सर्वमान्य समजाला पश्चिम द्रुतगती महामार्ग अपवाद ठरत आहे. या महामार्गावर वाहतुकीचे सर्व नियम पाळणाऱ्या दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्या घटना वाढत असून त्यासाठी या महामार्गावर अध्येमध्ये पडलेले खड्डे कारणीभूत आहेत. या मार्गावरील खड्डय़ांमध्ये चाक अडकून गाडी घसरण्याचा तसेच खड्डय़ांमध्ये टाकलेल्या खडीवरून घसरून पडल्याने दुचाकीस्वार जखमी होत आहेत.
पावसाळा सुरू झाल्यापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. वांद्रे ते दहिसर हा प्रवास करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागत असल्याचे या महामार्गावरून दर दिवशी प्रवास करणारे प्रवासी सांगतात. या वाहतूक कोंडीबरोबरच गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याचे वाहतूक पोलिसांतील सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्याभरात या मार्गावर झालेल्या दुचाकीस्वारांच्या अपघाताची संख्या २५ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या अपघातांसाठी बेदरकारपणे गाडी चालवणे किंवा तत्सम कोणत्याही गोष्टींचा संबंध नसून खड्डय़ांमुळे हे अपघात होत आहेत, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
दहिसर जकात नाक्यापासून पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबईची हद्द सुरू होते. या नाक्याजवळचा रस्ताच मोठय़ा प्रमाणात उखडला असून येथील खड्डे दुचाकीस्वारांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. विशेष म्हणजे रस्ता उखडून बारीक रेती आणि खडी रस्त्यावरच पडली असल्याने आपत्कालीन परिस्थिती ब्रेक मारल्यास दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यानंतर थेट वांद्रय़ापर्यंत हीच परिस्थिती असून टप्प्याटप्प्यात या महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. बोरिवली ते कांदिवली या दरम्यान असलेल्या उड्डाणपुलांखाली प्रत्येक चौकात रस्ता उखडलेला असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर उड्डाणपुलांवर सांध्यांची दुरुस्ती न झाल्याने उखडून वर आलेल्या लोखंडी पट्टय़ाही दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहेत.
गोरेगाव ते जोगेश्वरी यांदरम्यान असलेले दोन उड्डाणपूल ओलांडल्यावर मुंबईच्या दिशेने येताना रस्ता मध्येच खराब झाला आहे. या ठिकाणीही बारीक रेती आणि खडी तशीच पडल्याने वेगात असलेल्या दुचाकींवर अचानक नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबणेही अशक्य होते. तर दहिसरच्या दिशेने जाताना विलेपार्ले येथील उड्डाणपूल ओलांडल्यानंतर रस्ता अरुंद होत असल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. कलानगर येथील उड्डाणपूल अंधेरीला जाताना ओलांडताना उड्डाणपूल संपता संपता रस्ता प्रचंड खराब असून तेथे पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे येथून मार्गक्रमण करताना दुचाकींवर नियंत्रण आणणे कठीण बनत आहे.

३,२०० खड्डे
दहिसर चेक नाका ते माहीम जंक्शनपर्यंत २५.३३ किलोमीटर पसरलेल्या या महामार्गावर सध्या ३,२०० खड्डे पडले आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाची पाहणी सांगते. दिवसाला अडीच लाख वाहने यावरून ये-जा करतात. पूर्व द्रुतगती मार्गाच्या तुलनेत ७५ टक्के जड वाहनांची वाहतूक या महामार्गावरून होते. या शिवाय आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळ, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विद्यापीठ अशा अनेक महत्त्वाची संकुले या मार्गाला लागून असल्याने हा महामार्ग महत्त्वाचा समजला जातो.

मेट्रोच्या कामाचा फटका
वांद्रे ते दहिसर या दरम्यान दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर खड्डय़ांचे जाळे पसरले असून त्याशिवाय सध्या मेट्रो-७च्या बांधकामासाठी या रस्त्यावरील काही भाग अडवण्यात आला आहे. त्याचाही फटका काही प्रमाणात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीला बसत असून भविष्यात त्यात वाढ होणार आहे.