करोनामुळे राज्यात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान या दृष्टीने राज्य सरकार पाऊले उचलत आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये मे महिन्यात राज्यातील १०,८८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

नवाब मलिक म्हणाले, “विविध उपक्रमांद्वारे नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या व कॉर्पोरेट संस्थांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याद्वारे २०२० मध्ये राज्यात १,९९,४८६ तर चालू वर्षात जानेवारी ते मे अखेर ६३,०५५ बेरोजगारांना रोजगार देण्यात यश आले”

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करू शकतात, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.