राज्याच्या गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाज्येष्ठतेनुसार आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तींचा पायंडा पाडला आणि या नियुक्तया अजिबात रेंगाळतही ठेवल्या नाहीत. त्यानुसारच राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सेवानिवृत्त होण्याच्या आदल्या दिवशीच सतीश माथूर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी झाला. मात्र त्याचवेळी रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी सेवाज्येष्ठतेनुसार राकेश मारीया यांची नियुक्ती करणार की त्यांना डावलणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दीक्षित यांच्या निवृत्तीनंतर माथूर यांची सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती होणार हे निश्चित होते. परंतु त्याचवेळी सेवाज्येष्ठतेनुसार माथूर यांच्या जागेवर मारीया यांची नियुक्ती होणार का, याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे. मारीया यांची नियुक्ती विजय कांबळे यांची सेवाज्येष्ठता डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शासनाने केली होती. त्यामुळे मारीया यांना महासंचालकपदी बढती दिल्यानंतर मुंबईचे आयुक्तपद महासंचालक दर्जाचे वाढवूनही मारीया यांना तेथे न ठेवता अहमद जावेद यांची सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर संजीव दयाळ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर दीक्षित यांना सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्त करण्यात आले आणि दीक्षित यांच्याजागी सेवाज्येष्ठतेनुसार विजय कांबळे यांची नियुक्ती करून फडणवीस सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तयांमध्ये सुसूत्रतता आणली होती.

आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी सेवाज्येष्ठतेनुसार मारीया यांची नियुक्ती केली गेली तरच सुसूत्रता कायम राहणार असल्याची आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

मारीया हे जानेवारी २०१७ मध्ये तर माथूर हे जून २०१८ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मारीया यांना राज्याचे महासंचालकपद मिळण्याची शक्यता नाही.

मात्र सेवाज्येष्ठतेनुसार ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होऊ शकतात. परंतु त्यांची नियुक्ती न झाल्यास सेवाज्येष्ठता डावलल्याचा अनुभव मारीया यांना मिळेल, असे प्रतिक्रिया एका आयपीएस अधिकाऱ्याने दिली.