महिलांचा विनयभंग करून आपण सहज सुटू अशा भ्रमात राहणाऱ्यांना न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. दीड वर्षांपूर्वी महिलेची वाट अडवून तिचा विनयभंग करणाऱ्याला अंधेरी न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा सुनावली असून ५०० रुपये दंडही ठोठावला आहे.
साकीनाक्याच्या साकीविहार मार्गावरील आंबेडकरनगर येथे राहणारी एक महिला ऑक्टोबर २०१४ च्या सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक शौचालयास जाताना परिसरात राहणाऱ्या साई गायकवाड (२२) याने तिचा विनयभंग केला. महिलेने या प्रकाराची तक्रार साकीनाका पोलिसांकडे केली असता. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी त्याच दिवशी गायकवाडला अटक केली. तपास पूर्ण करून पोलिसांनी डिसेंबर २०१४ मध्ये महानगर दंडाधिकारी, ६६ वे न्यायालय, अंधेरी येथे आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात खटला चालून महानगरदंडाधिकारी अश्विनी लोखंडे यांनी गायकवाडला मंगळवारी एक वर्षांची शिक्षा सुनावली.