08 December 2019

News Flash

बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्याप्रकरण : एकाची फाशी, दुसऱ्याची जन्मठेप रद्द

अपहरणानंतर श्रीने प्रचंड त्रास दिल्याने आरोपींनी त्याची हत्या केली.

(संग्रहित छायाचित्र)

दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका

मुंबई : कामावरून काढल्याचा राग मनात धरून सात वर्षांपूर्वी मुंबईस्थित व्यावसायिकाच्या १२ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने कर्मचाऱ्याला सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द करत त्याची निर्दोष सुटका केली.

इम्तियाज अहमद महम्मद सादिक अली शेख याच्यावरील आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना पूर्णपणे अपयश आल्याचा ठपका ठेवत न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने त्याची फाशी रद्द करीत  निर्दोष सुटका केली.

न्यायालयाने त्याचा साथीदार आझाद अन्सारी (२८) यालाही कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करत त्याचीही सगळ्या आरोपांतून निर्दोष सुटका केली. त्याच्याविरोधातही पोलिसांना समाधानकारक पुरावे सादर करता येऊ शकले नाहीत, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

धारावी येथे एम्ब्रॉयडरीचे दुकान चालवणाऱ्या राजेश भांडगे यांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी २०१२ मध्ये पोलिसांनी इम्तियाज, आझादसह  तिघांना अटक केली होती. त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता.

पोलिसांच्या दाव्यानुसार, इम्तियाज आणि आझाद दोघेही भांडगे यांच्याकडे काम करत होते. योग्य प्रकारे काम करत नसल्याच्या कारणास्तव भांडगे यांनी इम्तियाज याला कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग मनात ठेवन इम्तियाजने त्यांचा मुलगा श्री याच्या अपहरणाचा आणि भांडगे यांच्याकडून २५ लाख रुपये उकळण्याचा कट रचला. २७ मे २०१२ रोजी इम्तियाज आणि अन्य आरोपींनी श्रीचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी भांडगे यांना दूरध्वनी करून खंडणीची मागणी केली. अपहरणानंतर श्रीने प्रचंड त्रास दिल्याने आरोपींनी त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका पोत्यात बांधून भिंवडी द्रुतगती महामार्गाजवळील भुयारी गटारात फेकून दिला. त्यानंतरही दोषींनी भांडगे यांना संपर्क साधून त्यांच्याकडे खंडणीच्या रकमेची मागणी केली. हे दूरध्वनी करण्यासाठी आठ सिमकार्ड वापरली गेली. पोलिसांनी फोनच्या आधारे ठावठिकाणा शोधून भिवंडी येथून इम्तियाज आणि अन्य दोन आरोपींना ताब्यात घतले होते.

परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे इम्तियाज आणि आझादला सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी मे महिन्यात दोषी ठरवले होते. न्यायालयाने शेख याला फाशीची, तर त्याचा साथीदार आझाद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अन्य दोघांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाला इम्तियाज आणि आझादने आव्हान दिले होते.

या प्रकरणी जुहू येथील गोळावाला आणि भिवंडी येथील रेस्टॉरंटमधील वेटरने इम्तियाज तसेच आझादसोबत श्री याला पाहिल्याची साक्ष दिली होती. एका मुलासोबत आरोपी जेवणासाठी आल्याची साक्ष वेटरने दिली होती, तर आरोपी आपल्या मित्राच्या घरी श्रीला घेऊन गेले होते. शिवाय इम्तियाजच्या आवाजाच्या नमुन्याच्या चाचणीतून त्यानेच भांडगे यांच्याकडे खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले होते. आरोपींनी श्री याची फार क्रूरतेने हत्या केली, असा दावा पोलिसांनी केला होता.

मात्र हा घटनाक्रम सिद्ध करू शकणारा ठोस पुरावा पोलीस सादर करू शकलेले नाहीत, असा ठपका न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ठेवला. तसेच आरोपींनी दिलेल्या माहितीनंतरच श्री याचा मृतदेह सापडल्याबद्दलही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन्ही आरोपी हे भांडगे यांच्याकडे आधी काम करीत होते आणि श्री याला या दोघांसोबत शेवटचे पाहण्यात आले. असे असले तरी या दोघांनीच त्यांची हत्या केल्याचे सिद्ध होत नाही, असेही न्यायालायाने नमूद केले आहे.

First Published on August 15, 2019 2:26 am

Web Title: accused in murder and kidnapping case awarded death penalty by the bombay high court zws 70
Just Now!
X