हत्या करुन फरार झालेला आरोपी १५ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपी विक्रांत उर्फ विकी भरत पटेल कारागृहातून पेरोलवर बाहेर पडलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. कारागृहातून फरार झालेल्या या आरोपीचा शोध घेत असतानाच खुनाच्या गुन्ह्यात फरारी असलेला विक्रांत उर्फ विकी भरत पटेल पोलिसांच्या हाती लागला. गेल्या १५ वर्षांपासून विक्रांत पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेने उमर पोलिसांच्या स्वाधीन केले.

आरोपी विक्रांत उर्फ विकी भरत पटेल याच्यावर १५ वर्षांपूर्वी उमरा पोलीस ठाण्यात हत्येचा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यात पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने या पाच आरोपीपैकी चार जणांना जन्मठेप तर एका आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली होती. याच गुन्ह्यातील एक आरोपी महेश बाबुराव भोसले हा कारागृहात बंदिस्त असताना २६ एप्रिल २०१८ रोजी पेरोलवर कारागृहातून बाहेर पडला. अन तो कारागृहात परतलाच नाही. त्यामुळे त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरु होता.

पेरोलवर फरार झाल्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी मुंबईसह इतर पोलीस ठाण्यांना माहिती देऊन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून गुन्हे शाखेचे अधिकारी महेश भोसले आरोपीच्या मागावर होते.

महेश भोसले सतत विकी पटेलच्या संपर्कात असल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करत होते. पुण्याच्या चिंतामणी नगरमध्ये विकी राहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक अमित देवकर, पोलीस हवालदार प्रदीप घरत, रवींद्र माने, आनंद तावडे यांनी पाळत ठेवून विकी पटेलला अटक केली. त्यानंतर विकी पटेल १५ वर्षांपूर्वी याच हत्येतील एक आरोपी असलयाचे निष्पन्न झाले. तो १५ वर्षांपासून  फरारी होता. अटकेनंतर गुहे शाखेने उमरा  पोलिसांना माहिती दिली. चौकशीसाठी विक्रांत उर्फ विकीला उमर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.