‘दिसायला चांगला आहेस, हिंदी चित्रपटसृष्टीत काम देतो..’ असे सांगून महाविद्यालयातील मुलांना लुबाडणाऱ्या एका ठगाला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एका महिन्यापूर्वी मोठय़ा शिताफीने अटक केली खरी! मात्र हा चोर पोलिसांवरही शिरजोर ठरला आणि त्याने रविवारी सकाळी ठाणे येथे गर्दीचा फायदा घेत रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. सायंकाळी उशिरापर्यंत या चोराचा काहीच माग न लागल्याने पोलीस मात्र हात चोळत बसले.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयातील मुलांना किंवा तरुणांना नेमके हेरून पुष्कर बाबरे हा तरुण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करायचा. ‘दिसायला चांगला आहेस, हिंदी चित्रपटसृष्टीत माझ्या काही ओळखी आहेत. फोटो काढून घे. साइड रोल वगैरेसाठी तुझे नाव सुचवतो. दिवसाला पाच हजार रुपये मिळतील,’ वगैरे मखलाशी करायचा. मग फेसबुकवर संबंधित मुलांना शोधून त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांना लॅपटॉपमध्ये आणि फोटो घेऊन भेटायला बोलवायचा. एखाद्या रेल्वेस्थानकावर त्यांना भेटून, ‘आता आपल्याला स्क्रीन टेस्ट, ऑडिशनसाठी जायचे आहे. बॅग माझ्याकडे देऊन चेहरा वगैरे नीट धुऊन या,’ असे सांगून या मुलांना प्रसाधनगृहात पिटाळून स्वत: बॅगेतील किमती ऐवज घेऊन पळ काढायचा.
डोंबिवली येथे राहणारे दिनेश जाधव व हर्षल कदम या दोघांनी डोंबिवली रेल्वे पोलिसांत पुष्करविरोधात १३ जून रोजी तक्रार दाखल केली. डोंबिवली रेल्वे पोलिसांनीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्कर बाबरे याला दोनच दिवसांत नालासोपारा येथून अटक केली. त्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी पुष्करला चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले होते.
ठाणे रेल्वे पोलिसांच्या कैदेत असलेल्या पुष्करला पोलीस रविवारी सकाळी प्रतीक्षालयात घेऊन जात होते. रेल्वे फलाट गर्दीने फुलले होते. याच गर्दीचा फायदा घेत पुष्करने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. याबाबत ठाणे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता, पुष्करने पळ काढल्याची बातमी खरी असून आम्ही त्याच्या मागावर आहोत, असे उत्तर देण्यात आले.