विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांना लैंगिक छळाच्या गुन्ह्य़ात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. हांडे यांनी २००४ ते २००७ या काळात लैंगिक छळ केल्याचा आरोप सोमय्या महाविद्यालयातील प्राध्यापिकेने केला आहे. याचबरोबर हांडे यांना काही महिन्यापूर्वीच लैंगिक छळाच्या आणखी एका गुन्ह्य़ातही अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

‘सोमय्या महाविद्यालयात प्राचार्य पदावर असताना हांडे यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून अश्लील वर्तन करत लैंगिक छळ केला होता. याविरुद्ध आवाज उठवून महिला आयोगाकडे तक्रार करताच सेवेतून बडतर्फ केले होते’, असा आरोप पीडित प्राध्यापिकेने केला आहे. त्याबाबत सोमय्या ट्रस्ट, महाविद्यालय प्रशासन, राज्य सरकार, महिला आयोग, मुंबई विद्यापीठ पोलिसांत तक्रार करूनही प्राध्यापिकेला दाद मिळाली नाही. परिणामी या पीडित प्राध्यापिकेने सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिले. याप्रकरणी तब्बल १० वर्षांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात हांडेंवरोधात गुन्हा दाखल झाला.

‘लोकसत्ता’ने २ नोव्हेंबर २०१८ च्या अंकात ‘प्राध्यापक महिलेचा प्राचार्याकडून लैंगिक छळ?’ या मथळ्याखाली या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. या गुन्ह्य़ात अटक होण्याची शक्यता लक्षात घेता हांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली आहे, अशी माहिती टिळकनगर पोलिसांनी दिली.

या संदर्भात प्रतिक्रियेसाठी हांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

झाले काय? : सोमय्या महाविद्यालयानंतर हांडे हे मिठीबाई महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दाखल झाले होते. या महाविद्यालयात मानसशास्त्रासंबंधित बैठकीचे आयोजन केले होते. त्यादरम्यान हांडे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप मानसशास्त्रातील तज्ज्ञ महिलेने केला. त्यावेळी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘या प्रकरणात हांडे यांना काही महिन्यांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी दिली.