डॉ. पायल यांच्या खास मैत्रिणीचा जबाब

मुंबई : डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉक्टर अंकिता खंडेलवाल यांनी आपल्याला तुम्ही राखीव जागांवर प्रवेश मिळवला आहे ना, ‘नीट’मध्ये तुमचा गुणानुक्रम काय होता, राखीव जागा नसत्या तर तुम्हाला येथे प्रवेश मिळालाच नसता, असे हिणवले होते, असा जबाब डॉ. पायल तडवी यांची मैत्रीण डॉ. स्नेहल शिंदे यांनी दिला आहे.

डॉ. तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांविरोधात पोलिसांनी मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. त्यात डॉ. तडवी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीप्रमाणेच डॉ. स्नेहल यांचा जबाबही महत्त्वपूर्ण पुरावा असल्याचे म्हटले आहे. शिंदे या डॉ. तडवी यांच्या खास मैत्रीण असून तिन्ही आरोपींनी या दोघींचीही छळवणूक केल्याचे डॉ. तडवी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून आणि डॉ. शिंदे यांच्या जबाबातून पुढे आले आहे.

डॉ. शिंदे यांच्या जबाबानुसार, तिन्ही डॉक्टर पायल यांना अतिशहाण्या, तर आपल्याला मंद म्हणायच्या. आपण आणि डॉ. तडवी २०१८ पासून स्त्रीरोग विभागात काम करत होतो. तेथे या तिघी आपल्याला वरिष्ठ होत्या. त्या सतत आम्हाला त्रास देत असत, आमची खिल्ली उडवत.

एकदा शस्त्रक्रिया विभागात या तिघींसोबत मी आणि डॉ. तडवी होतो. त्या वेळी अचानक या तिघींनी ‘तुम्ही राखीव कोटय़ातून प्रवेश मिळवला आहे ना, ‘नीट’मध्ये तुमचा गुणानुक्रम काय होता, असे आम्हाला विचारले होते. राखीव कोटय़ातून आला नसता तर तुम्हाला येथे प्रवेशच मिळाला नसता’, अशी शेरेबाजीही केली होती. त्यांच्या या विचारणेमुळे आम्हाला धक्काच बसला होता. त्यानंतरही या तिघी आम्हाला मंद आहात, मूर्ख आहात, असे हिणवत.

आम्हा सगळ्या डॉक्टारांचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर एक ‘रिमांडयर ग्रुप’ होता. तेथे दिनक्रम, अन्य आदेश याबाबत आठवण करून दिली जायची. या ‘ग्रुप’वरही डॉ. हेमा, डॉ. भक्ती आणि डॉ. अंकिता या मला आणि डॉ. तडवी यांना काहीच येत नाही, काहीच कळत नाही असे लिहायच्या, असे डॉ. शिंदे यांनी जबाबात म्हटले आहे.

डॉ. तडवी यांच्या स्थितीबाबत जबाब नोंदवताना डॉ. शिंदे यांनी सांगितले की, गेल्या नोव्हेंबर महिन्यात एकदा डॉ. तडवी यांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. तसेच आपल्याला तिन्ही वरिष्ठ डॉक्टरांची वागणूक सहन होत नाही. मला पुढे येथे शिकायचे नाही, असे सांगितले होते. त्या वेळी तू आताच काही निर्णय घेऊ नको. मी सायंकाळी भेटून बोलू, असे तिला समजावले होते.’

त्यानंतर ९ मे आणि १५ मे रोजी डॉ. हेमा, डॉ. भक्ती आणि डॉ. अंकिता यांनी सगळ्यांसमोर आमची खिल्ली उडवली होती, असा आरोपही डॉ. शिंदे यांनी जबाबात केला आहे.