महिला पोलिसाला मारहाण केल्याच्या कृत्याचा आपल्याला पश्चाताप असल्याचे २२ वर्षांच्या तरूणाने सांगितल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २० डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेला बसता यावे यासाठी उच्च न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला. त्याचवेळी  २० हजार रुपयांची रक्कम महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीत आठवडाभरात जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने त्याला दिले आहेत.

या तरुणाची आई फरारी असून तिला न्यायालयाने पंढरपूर शहर पोलिसांसमोर एका आठवडय़ाच्या आत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

या तरुणावर आणि त्याच्या आईवर २२ ऑक्टोबरला पंढरपूर शहरातील वाहतूक महिला पोलिसाला मारहण केल्याचा आरोप आहे. बंद रस्त्याच्या ठिकाणी गाडी नेल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे संबंधित  महिला पोलिसाने त्यांची गाडी अडवली. त्यानंतर तरूणाला आणि त्याच्या आईला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तरूणाची आई निवृत्त पोलीस अधिकारी आहे. तिने महिला पोलिसाला मारहाण केली आणि कायदेशीर कारवाई करण्याबाबत धमकावले. नंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली. मात्र त्याची आई फरारी आहे.

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे नमूद करत कनिष्ठ न्यायालयाने या तरुणाला यूपीएससीच्या परीक्षेला बसण्याकरिता तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याला या परीक्षेला बसू दिले नाही, तर आपले भवितव्य अंधारमय होईल, असा दावा या तरुणाने जामिनाची मागणी करताना केला होता. पोलिसांनी त्याच्या याचिकेला विरोध केला.