हवाई छायाचित्रण हा प्रकार देशात लोकप्रिय करणारे आणि या क्षेत्रात स्वतचा स्वतंत्र ठसा उमटवणारे ख्यातनाम छायाचित्रकार गोपाळ बोधे (६६) यांचे शनिवारी नैनिताल येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. बोधे जिम कॉर्बेट अभयारण्यात गेले होते. तेथे अस्वस्थ वाटू लागल्याने बोधे यांना उपचारासाठी नैनितालमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.
बोधे हे निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्रणही करत होते. मात्र ते लोकांपर्यंत पोहोचले ते हवाई छायाचित्रणामुंळे  एखादी संकल्पना घेऊन त्यावर हवाई छायाचित्रण करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. देशभरातील दीपगृहे, मुंबईतील विविध स्थळे, राज्यातील विविध गड आणि किल्ले यांची हवाई छायाचित्रे बोधे यांनी टिपली होती. भारतातील १६ हजार किलोमीटरचा सागरी किनारा आणि लडाखचे हवाई छायाचित्रण करणारे ते एकमात्र भारतीय छायाचित्रकार होते.  बोधे यांच्या निधनाने छायाचित्रण जगताचे खूप मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील गड व किल्ले, देशभरातील देवळे आणि अन्य विषयांवर हवाई छायाचित्रे काढून त्याच्या दस्तावेजीकरणाचे मोठे काम बोध यांनी केले अशा शब्दांत  राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी श्रद्धांजली वाहिली.