वांद्रे टर्मिनस येथील अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठी हिच्या कुटुंबियांनी न्यायासाठी अखेर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रीतीवर हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात, किंबहुना त्याची ओळख पटविण्यातही अपयशी ठरलेल्या मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त करीत राठी कुटुंबियांनी प्रकरणाची सूत्रे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्याची मागणी केली आहे.
कुलाबा येथील नौदल रुग्णालयात परिचारिका म्हणून कारकीर्द सुरू करण्याच्या हेतूने गेल्या २ मे रोजी प्रीती मुंबईत दाखल झाली होती. मात्र वांद्रे टर्मिनस येथे गाडीतून उतरल्यानंतर लगेचच एका अनोळखी तरुणाने प्रीतीवर अॅसिड फेकले आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. महिनाभर तिच्यावर उपचार सुरू होते व २ जून रोजी तिचा मृत्यू झाला होता. परंतु अद्यापही पोलिसांना तिच्यावर हल्ला करणाऱ्याला गजाआड करता आलेले नाही. तो कोण आहे याचा सुगावाही पोलिसांना लागलेला नाही.
या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली असली, तरी तोच हल्लेखोर आहे याची पोलिसांनाच खात्री नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या तपासावर आपला विश्वास नसल्याचा आरोप करीत प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे सोपविण्याची मागणी प्रीतीचे वडील अमरसिंह राठी यांनी याचिकेद्वारे केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 3:39 am