कांदिवलीतील एका अल्पवयीन मुलीवर फुग्यातून अ‍ॅसिड हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अंगावर फेकलेल्या फुग्यात अ‍ॅसिड होते. त्यात मुलीच्या अंगावरील कपडे जळाले असून, तिच्या प्रसंगावधानामुळे तिला कुठलीही इजा झाली नाही. कदम वाडीतील बोरसापाडा येथे राहणारी १७ वर्षीय मुलगी घराजवळ असताना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास तिच्या दिशेने एक फुगा आला. हा फुगा चुकविण्यासाठी मुलीने आपला चेहरा दुसरीकडे वळविला. मात्र, या फुग्यात असलेल्या रसायनाचे शिंतोडे तिच्या कपडय़ांवर उडाले. त्यामुळे तिचे कपडे काही प्रमाणात जळाले. मुलीने पालकांसह कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा करताना मुलीच्या शरीरावरील कपडे जळाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या शरीरावर कुठल्याही जखमा झाल्या नसल्याचे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी स्पष्ट केले.