आईने दुसरे लग्न केले म्हणून तिला त्रास देणाऱ्या मुलाची सावत्र बापाने हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) शिवाजी नरवणे यांना शनिवारी अटक केली. मुलाची आई नंदा झोडगे हिलाही अटक झाली आहे.
चेंबूरच्या टिळकनगर येथील इमारत क्रमांक १५८/४ मध्ये रोहन झोडगे (२५) हा आई नंदा, लहान भाऊ आणि बहिणीसह राहात होता. नंदाने रोहनच्या वडिलांना म्हणजे पहिल्या पतीला २००९ मध्ये सोडले होते. तिने शिवाजी नरवणे यांच्याशी विवाह केला होता. त्याला रोहनचा विरोध होता. त्यावरून तो आईला सारखा त्रास द्यायचा. चेंबूरमधील दोन घरांपैकी एक आपल्या नावावर करावे असा तगादाही त्याने लावला होता. त्यामुळेच रोहनचा काटा काढण्याचा निर्णय नंदा आणि शिवाजी नरवणे या दोघांनी घेतला. गुरुवारी रात्री नंदा दोन्ही मुलांना घेऊन परिसरातच राहणाऱ्या भावाच्या घरी झोपण्यासाठी गेल्या. रोहन घरीच थांबला. त्यावेळी शिवाजी नरवणे यांनी रोहनची चाकूचे वार करून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी नंदा यांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नंदा यांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजी नरवणे यांना अटक करण्यात आली. त्यांना ३१ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सध्या सुरक्षा व संरक्षण विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त असलेले शिवाजी नरवणे १९८३ मध्ये मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर रूजू झाले होते. मुंबई व ठाण्यात त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. टिळकनगर येथेही त्यांनी काम केले होते.