मावळ परिसरात शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी एम. जी. गायकवाड समितीने जबाबदार ठरविलेले पोलीस अधिकारी संदीप कर्णिक यांच्यासह अन्य पोलिसांवर कारवाई काहीच कारवाई न करणाऱ्या राज्य सरकारची कानउघाडणी करीत या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला दिले. प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा करीत न्यायालयाने सरकारकडून त्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र समितीने शिफारस करून आणि सरकारने ती मान्य करून एवढे महिने उलटले तरी या अधिकाऱ्यांवर अद्याप काहीच कारवाई केली नसल्याची बाब खंडेलवाल यांनी शुक्रवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या अधिकाऱ्यांना अद्याप कारणे दाखवा नोटीस का बजावण्यात आली नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात आली नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत न्यायालयाने न्यायालयाने कायद्यानुसार या अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करीत जमावावर गोळीबार केल्याचा आरोप खंडेलवाल यांनी करीत जनहित याचिकेद्वारे प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.