News Flash

रूळ ओलांडणाऱ्या १६ हजार जणांवर कारवाई

एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाताना रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे.

गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाने केवळ पश्चिम रेल्वेमार्गावर केलेल्या कारवाईत तब्बल १६६७४ जणांना रूळ ओलांडताना पकडले.

‘कृपया रेल्वेरूळ ओलांडू नका. ते धोक्याचे आहे..’ अशा अर्थाच्या उद्घोषणा वारंवार करूनही प्रवाशांना आणि लोकांना समज येत नसल्याचे गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईद्वारे स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाने केवळ पश्चिम रेल्वेमार्गावर केलेल्या कारवाईत तब्बल १६६७४ जणांना रूळ ओलांडताना पकडले. या सर्वाकडून ६२ लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला असून दंडाप्रमाणेच त्यांना समजही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच वर्षांत फक्त पश्चिम रेल्वेवर ६०४ जणांचा मृत्यू रूळ ओलांडताना झाला होता.
रेल्वे स्थानकांमध्ये एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाताना रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मात्र आता दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडणारे लोक रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. स्थानकांमध्ये रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांबरोबरच दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने एक विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेद्वारे पश्चिम रेल्वेवरील संवेदनशील स्थानकांप्रमाणेच दोन स्थानकांदरम्यानच्या संवेदनशील जागांवरही रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी बंदोबस्त ठेवला होता.
या मोहिमेत गेल्या वर्षी एकूण १६ हजार ६७४ जणांना रूळ ओलांडताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांपकी १८०१ लोकांनी रेल्वेरूळ ओलांडताना आपला जीव गमावला. त्यापकी ६०४ अपघात पश्चिम रेल्वेवर झाले होते. त्याआधी २०१४ मध्ये १९१२ जणांचा मृत्यू रेल्वेरूळ ओलांडताना झाला होता. त्यापकी पश्चिम रेल्वेवर झालेल्या अपघातांतील मृतांची संख्या ६९६ एवढी होती. गेल्या वर्षी कारवाई केलेल्या १६६७४ प्रवाशांपकी १६१२० लोकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ६२.३७ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. ७९ जणांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि उरलेल्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
रेल्वेरूळ ओलांडण्याच्या घटना घडतात कुठे?
माहीम-वांद्रे, वांद्रे-खार, खार-सांताक्रूझ, विलेपाल्रे-अंधेरी, जोगेश्वरी-गोरेगाव, मालाड-कांदिवली-बोरिवली, नालासोपारा, वसई आणि विरार येथे रूळ ओलांडण्याच्या घटना जास्त घडतात. यातही जोगेश्वरी-गोरेगाव येथे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 12:44 am

Web Title: action against 16 thousand people for crossing railway tracks
Next Stories
1 घराच्या आर्थिक चणचणीवर चारचाकीने मात
2 येत्या तीन वर्षांत ‘बेस्ट’च्या ग्राहकांवर चार हजार कोटींचा ‘भार’?
3 ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांना चैत्र-चाहुलचा ‘ध्यास सन्मान’!
Just Now!
X