वीज, पाणी आणि गॅसपुरवठा खंडीत केल्यानंतरही वरळीच्या कॅम्पाकोलामधील अनधिकृत सदनिकेच्या आश्रयाला काही रहिवाशी आहेत. मात्र या सदनिकांवर हातोडा चालविण्याची तयारी पालिकेने सुरू केली असून बुधवापर्यंत कारवाईचा दिवस निश्चित करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने कॅम्पाकोलामधील अनधिकृत सदनिकांवर तीन टप्प्यांमध्ये कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात वीज, पाणी आणि गॅस पुरवठा खंडीत करण्याचा, दुसऱ्या टप्प्यात अनधिकृत सदनिकांच्या भिंती तोडण्याचा आणि तिसऱ्या टप्प्यात मोठे पिलर्स तोडण्यात येणार आहेत.
आता कॅम्पाकोलातील अनधिकृत सदनिकांमध्ये अंधारच आहे. परंतु काही रहिवाशी आजही तेथेच आहेत. टँकरचे पाणी आणि जनरेटर, बॅटरीचा वापर ही मंडळी करीत आहेत. कारवाईनंतरही कॅम्पाकोलामध्ये अनधिकृत सदनिकांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांचा आढावा घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कारवाई करण्यासाठी मंगळवार आणि बुधवारी पालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अनधिकृत सदनिकांच्या आतील भिंती तोडण्याबाबत व्यूहरचनाही करण्यात येणार आहे.