वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल डॉक्टर इंग्लडमध्ये दोषी

मुंबई : वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याने एका शल्यचिकित्सकाला उपनगरातील नामांकित इस्पितळाने बाहेरचा रस्ता दाखविला. हा शल्य चिकित्सक इंग्लंडमध्ये जाऊन वैद्यकीय व्यवसाय करू लागल्याचे कळताच रुग्णाच्या नातेवाईकाने त्याच्याविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची केवळ दखलच नव्हे तर तक्रारदाराला बिझनेस क्लास विमान प्रवासासह निवास आणि जेवणभत्ता देऊन इंग्लंडमधील संबंधित यंत्रणेने सुनावणी घेत या शल्यचिकित्सकाला दोषी ठरविले आहे.

या आदेशाविरुद्ध या शल्य चिकित्सकाला चार आठवडय़ात अपील करता येणार आहे. परंतु तोपर्यंत या शल्यचिकित्सकाला इंग्लडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यावर बंधन आले आहे. त्याचवेळी राज्यात ग्राहक न्यायालय तसेच वैद्यकीय परिषदेकडे याबाबत दोन वर्षांपासून फक्त सुनावणी सुरू आहे.

मुंबईतील एका प्रतिष्ठित इस्पितळात जुलै २०१४ मध्ये सुषमा अग्रवाल यांना कर्करोगावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु या शस्त्रक्रियेनंतर त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये संबंधित तज्ज्ञ शल्यचिकित्सकाचा वैद्यकीय निष्काळजीपणा असल्याचे सुषमा यांचे पुत्र अवंताश अग्रवाल यांनी दाखवून दिले.

वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून त्यांनी राज्य ग्राहक आयोग तसेच वैद्यकीय परिषदेत २०१६ मध्ये तक्रार दाखल केली. त्यामुळे इस्पितळानेही ते मान्य करीत संबंधित शल्यचिकित्सकाला राजीनामा देण्यास भाग पाडले. राज्य ग्राहक आयोग आणि वैद्यकीय परिषदेत यावर या शल्यचिकित्सकाने आपले म्हणणेही मांडले. परंतु अद्याप सुनावणी पूर्ण होऊ शकलेली नाही. याच काळात सदर शल्यचिकित्सक इंग्लंडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती अवंताश अग्रवाल यांना मिळाली. त्यांनी इंग्लडमधील जनरल मेडिकल कौन्सिलकडे २०१७ मध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सुनावणी सुरू झाली.

चार महिन्यांपूर्वी अवंताश यांना सुनावणीसाठी इंग्लडमध्ये पाचारण करण्यात आले. मात्र इंग्लडमध्ये उपस्थित राहण्यासाठी अवंताश यांना कौन्सिलने बिझिनेस क्लासचे रिटर्न विमान तिकिट, निवास व्यवस्था तसेच जेवण भत्ता दिला. आता याबाबतचा निकाल जारी झाला असून त्यात संबंधित शल्यचिकित्सकाला दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे नाव इंग्लडमधील जनरल मेडिकल कौन्सिलमधून काढून टाकण्यात आले आहे.  या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे.

इंग्लडमध्ये वैद्यकीय सेवेबाबत असलेली संवेदनशीलता आणि तत्परता या प्रकरणातून दिसून येत आहे. साक्षीसाठी बोलावताना सर्व प्रवासखर्च तेथील यंत्रणेने दिला, हे लक्षणीय आहे. इतकेच नव्हे तर निकालही दिला. आपल्याकडे राज्य ग्राहक आयोग, वैद्यकीय परिषदेपुढे तक्रार दोन वर्षे प्रलंबित आहे.

– अ‍ॅड. शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत