मुंबई : रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमाब या औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने शनिवारी दिले.

या औषधांचा नियंत्रित वापर व्हावा आणि गरजू रुग्णांना ती त्वरित उपलब्ध होण्यासाठी काळाबाजार थांबविणे गरजेचे आहे. या औषधांची गैरमार्गाने विक्री करणाऱ्यांना पुरवठा करू नये, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेते आणि संघटनांना दिले आहे. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहेत.

‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन देताना करोना चाचणी अहवाल, डॉक्टरांची चिठ्ठी, रुग्णाचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे जोडण्याच्या सूचना उत्पादन कंपनीने विक्रेत्यांना दिल्या आहेत. याचेही पालन केले जाते का याची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच या औषधांच्या खरेदी विक्रीवरही लक्ष ठेवून काळाबाजार होणार नाही यासाठी सतर्क राहण्याच्या सूचनाही औषध प्रशासनाच्या  विभागीय सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.