मुंबईमधील २०८ रस्त्यांच्या चौकशीचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असून, याप्रकरणी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी दिले. त्यामुळे रस्ते विभागाची जबाबदारी असलेले, मात्र आता पालिकेत नसलेले सनदी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्यावर कारवाई होणार असल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.

रस्ते कामांमध्ये होत असलेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे गोपनीय पत्राद्वारे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. स्थापन केलेल्या चौकशी समितीने ३४ रस्त्यांची पाहणी केल्यानंतर कामांमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. आता २०८ रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात येत आहे. रस्ते घोटाळाप्रकरणी कंत्राटदारांनी नियुक्त केलेल्या खासगी लेखानिरीक्षकांना अटक केल्यानंतर रस्ते विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्यात दोषी आढळलेले अधिकारी आणि कंत्राटदारांची गय केली जाणार नाही. मग कितीही वरिष्ठ अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच, असे अजय मेहता यांनी स्पष्ट केले. मेहता यांच्या भूमिकेमुळे त्यावेळी रस्ते विभागाची सूत्रे हाती असलेले पालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. श्रीनिवास यांची सिकॉममधील व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्याची चर्चा पालिकेत रंगली होती.