वाहतूक नियमाचे उल्लंघन करून पुढे जाल, तर सावधान..! पोलीसदादाही आता अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करू शकणार आहेत. साध्या पोलिसांना तशा प्रकारचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. राज्य सरकारतर्फेच उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका सचिवाच्या मुलावर कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून दंडात्मक कारवाईचे हे अधिकार साध्या पोलिसांकडून काढून हेड कॉन्स्टेबलकडे सोपवण्यात आले होते. मात्र, साध्या पोलिसांना पुन्हा हे अधिकार देण्याची मागणी होत होती. पोलिसांना हे अधिकार बहाल करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून बासनातच गुंडाळून ठेवण्यात आला होता. त्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी केली होती. त्यावर सरकारी वकील जसबीर सलुजा यांनी साध्या पोलिसांनाही दंडात्मक कारवाईचे अधिकार दिल्याचे बुधवारी उच्च न्यायालयात सांगितले.
दंडातील निम्मा निधी देण्याबाबत सरकार उदासीनच
वाहतूक पोलिसांचे आधुनिकीकरण वा सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने दंडरूपाने जमा होणाऱ्या एकूण निधीतील ५० टक्के रक्कम देण्यात यावी, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांतर्फे सरकारकडे करण्यात आलेला आहे. याची दखल घेत न्यायालयानेही या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. मात्र या प्रस्तावाबाबत वित्त विभागाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नसल्याची माहिती सरकारने दिल्याने प्रस्तावाबाबत सरकार उदासीन असल्याचे स्पष्ट झाले.
महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस
मुंबईत आजमितीला २.३५ कोटी वाहने असून त्यांचे स्कॅनिंग आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहितीही सलुजा यांनी न्यायालयाला दिली. मात्र २००६ च्या आधीच्या वाहनांची माहिती आरटीओकडे उपलब्ध नसल्याने २००६ नंतरच्या वाहनांचेच स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मुंबईतील महत्त्चाचे सिग्नल व चौकामध्ये एक वाहतूक पौलीस तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 5:15 am