News Flash

कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई बेकायदा

उच्च न्यायालयाचा निर्णय, पालिकेची नोटीस आणि आदेशही रद्द 

(संग्रहित छायाचित्र)

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यातील बांधकामावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवली. कोणाही नागरिकाविरोधात बळाचा वापर करून केलेली कारवाई मान्य केली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने कारवाईची नोटीस आणि आदेश रद्द करताना प्रामुख्याने स्पष्ट केले.

कंगनाला बजावलेली नोटीस बेकायदा होती. अशा नोटिसा बेकायदा बांधकाम सुरू असताना बजावल्या जातात. मात्र या प्रकरणात बेकायदा बांधकाम पूर्ण झाल्यावर नोटीस बजावण्यात आली, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने या वेळी कंगनाची नुकसानभरपाईची मागणीही मान्य केली. या कारवाईमुळे कंगनाचे जे आर्थिक नुकसान झाले आहे, त्याच्या मूल्यमापनासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंगना आणि पालिकेची बाजू ऐकल्यानंतर नुकसानभरपाईबाबतचा अहवाल मार्च २०२१ पर्यंत द्यावा, असे आदेशही न्यायालयाने कंपनीला दिले.

पालिकेतही शिवसेनेचीच सत्ता असल्याने आपण केलेल्या वक्तव्याचा सूड उगवण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचा आरोप कंगनाने केला होता. पालिकेने मात्र तो अमान्य केला होता. मात्र पालिकेने सादर केलेली कंगनाच्या घराची छायाचित्रे आणि एकूण घटनाक्रम लक्षात घेता पालिकेची कारवाई ही पूर्वनियोजित, द्वेषापोटी आणि नागारिकांच्या हक्कांविरोधात असल्याचेच निदर्शनास येते, असे न्यायालयाने १६६ पानी निकालात नमूद केले आहे.

मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिला मुंबई येण्याबाबत शिवसेनेच्या मुखपत्रातून इशारा दिला होता. त्यानंतर कंगना घरी नसताना आणि तिला नोटिशीला उत्तर देण्यासाठी, कायदेशीर बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी न देता पालिकेने कारवाई केली. पालिकेने ज्या तत्परतेने कारवाई केली. त्यावरून पालिका प्रशासनाचा कारवाईमागील कुहेतू लक्षात येतो, त्याचबरोबर कायद्याचा आणि सत्तेचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होते, असे न्यायालयाने नमूद केले. पालिकेच्या कारवाईमुळे कंगनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

कंगनाला समज

महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवताना आणि पालिकेच्या कृतीवर ताशेरे ओढताना मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणणाऱ्या तसेच विशिष्ट व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या कंगनालाही न्यायालयाने समज दिली. एखादी व्यक्ती, सरकार, सरकारी यंत्रणा वा चित्रपटसृष्टीविरोधात बेजबाबदार वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे कंगनानेही भविष्यात अशी वक्तव्ये करणे टाळावी, असा सल्ला न्यायालयाने दिला.

संजय राऊतांवरही ताशेरे

कायदा सर्वश्रेष्ठ आहे, याची पर्वा न करता संजय राऊत यांनी कंगनाला धडा शिकवण्याची भाषा केली. असे आचारण एका पक्षाच्या नेत्याला आणि खासदाराला शोभत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

तोडलेले बांधकाम पूर्ववत करण्यास मुभा

बंगल्यातील जे बांधकाम पालिकेने तोडले ते मंजूर आराखडय़ानुसार आणि पालिकेच्या पूर्वमंजुरीनंतर पूर्ववत करण्याची परवानगी न्यायालयाने कंगनाला दिली. त्याच वेळी या बांधकामापैकी जे बांधकाम बेकायदा असेल ते नियमित करण्यासाठीही पालिकेकडे अर्ज करण्याची सूचनाही केली.

कारवाई नियमानुसारच -महापौर

महापालिकेने कलम ३५४ अन्वये नोटीस बजावून ही कारवाई केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर करून मुंबईकर आणि राज्यातील नागरिकांची मने दुखावली.  मात्र त्याचा आणि कारवाईचा काहीही संबंध नाही. न्यायालयाच्या आदेशाबाबत पालिकेच्या कायदा विभागाकडून योग्य तो सल्ला घेण्यात येईल. न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

न्यायालय म्हणाले..

* एखाद्या नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला तरी सरकार आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरते.

* ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरीही प्रशासन कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन वा बळाचा वापर करून कारवाई करू शकत नाही

* महापालिकेची कारवाई कायद्याच्या चौकटीत नव्हती, तर कुहेतूने आणि नागरिकांच्या अधिकारांविरोधात होती.

* बेकायदा आणि राजकीय रंग असलेली कारवाई सरकार वा सरकारी यंत्रणांकडून केली जाणे अधिक गंभीर आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे समाजाचे नुकसान करणारे असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 12:11 am

Web Title: action against kangana bungalow is illegal high court abn 97
Next Stories
1 करणच्या पोस्टला मधुर भांडारकर यांचे उत्तर, म्हणाले…
2 छोट्या पडद्यावरील अभिनेता शाहीर शेखने केले लग्न, फोटो व्हायरल
3 …म्हणून कंगनाने घेतली संजय दत्तची भेट
Just Now!
X