एक हजार रुपये दंड

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आदी ठिकाणी थुंकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आदी ठिकाणी थुंकून अस्वच्छता करणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेशच पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी पालिका आणि पोलिसांना दिले.

मुंबईमधील करोना बाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन पालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर गर्दी होणारी मॉल, चित्रपटगृह, नाटय़गृह आदी ठिकाणे बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृह, नाटय़गृह आदी बंद ठेवण्यात आले आहेत. आता करोनाचा  प्रादुर्भाव टाळण्यासाठी रस्त्यांवर अस्वच्छता करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक जण पान खाऊन सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आदी ठिकाणी थुंकून अस्वच्छता करीत असतात. करोना बाधिताच्या थुंकण्यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रवीणसिंह परदेशी यांनी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांना दिले आहेत. थुंकून अस्वच्छता करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

घनकचरा विभागातर्फे  कारवाई

रस्ते, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध कारवाई  करण्यासाठी पालिकेने क्लीन अप मार्शलना तैनात केले आहे. मात्र रेल्वे स्थानक, निवडक सार्वजनिक ठिकाणीच क्लीन अप मार्शल तैनात आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांना कारवाईचे अधिकार असतील. घनकचरा व्यवस्थापन विभागाने अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.