मुंबईतील ४९ विक्री केंद्रांवर कारवाई 

ताडाची झाडे नसतानाही मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेडमध्ये ताडी विक्री दुकानांतून मिळणारी ताडी भेसळयुक्त असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत मुंबईतील ४९ विक्री केंद्रे तूर्तास बंद करण्यात आली आहेत. आता राज्य शासन ताडीच्या दुकानांच्या परवान्याबाबत नवे धोरण तयार करीत असून त्यानुसार ज्या ठिकाणी ताडाची झाडे नसतील त्या ठिकाणी ताडीविक्रीच्या दुकानांना यापुढे परवानगी देण्यात येणार नाही. हे नवे धोरण अमलात आल्यास मुंबई, ठाण्यातील तब्बल अडीचशे ताडी विक्री केंद्रांवर गदा येणार आहे.

राज्यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर येथे तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, ,सोलापूर, पुणे तसेच मराठवाडय़ातील नांदेड परिसरात ताडाची झाडे आढळतात. या परिसरात शुद्ध ताडी मिळू शकते. मात्र ज्या ठिकाणी ताडाची झाडे नाहीत, अशाा ठिकाणी मिळणाऱ्या ताडीत प्रामुख्याने क्लोरल हायड्रेट मिसळलेले असते. या प्रकरणी हैदराबाद येथील एका संस्थेने भेसळयुक्त ताडी ओळखण्याची यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचा वापर केल्यास भेसळयुक्त ताडी तात्काळ पेट घेते. या भेसळयुक्त ताडीचे नमुने घेऊन ते हाफकिन इन्स्टिटय़ूटमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. क्लोरेल हायड्रेट असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित विक्री केंद्रांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दोन दिवसांची मोहीम राबविण्यात आली होती. या अधिकाऱ्यांना भेसळयुक्त ताडी तपासण्यासाठी खास यंत्रणा देण्यात आली होती. या तपासणीचे अहवाल धक्कादायक आहे. प्रत्येक पाच विक्री केंद्रामागे प्रत्येकी एका विक्री केंद्रात भेसळयुक्त ताडी आढळून आली. मुंबई, पुण्यात हे प्रमाण मोठय़ा प्रमाणात आढळले. ज्या ठिकाणी ताडाची झाडे आहेत अशा ठिकाणीही भेसळयुक्त ताडी आढळून आली, असे उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांनी सांगितले. नव्या धोरणामुळे राज्यातील तब्बल ६० ते ७० टक्के ताडीची दुकाने बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताडी विक्रीतून मिळणाऱ्या महसुलातही मोठय़ा प्रमाणात घट होणार आहे. परंतु आरोग्याला अपायकारक ताडी उपलब्ध होण्यापेक्षा अशी विक्री केंद्रे बंद झालेली बरी अशी भूमिका या खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.