पहिल्याच दिवशी ३४१ जणांवर कारवाई
रेल्वेमार्गावर दरवर्षी होणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक अपघातांपैकी जवळपास ५० टक्के अपघाती मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आता रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नयेत, असे आवाहन करण्यापासून रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत अनेक उपाय या मोहिमेदरम्यान राबवण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल ३४१ जणांवर कारवाई करण्यात आली.
गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील एकूण मृत्यूंपैकी ४६४३ मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत; तर ११४५ जण या चार वर्षांत जखमी झाल्याची नोंद आहे. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाल्यानंतर मृत्युमुखी पडण्याची शक्यता जास्त असल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येते. ‘भावेश नकाते’ प्रकरणानंतर मध्य रेल्वेवरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आता मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दल यांनी एकत्रितपणे मोहीम राबवण्यास सुरुवात केली रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना सहा महिने तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

गेल्या चार वर्षांतील अपघाती मृत्युंची संख्या
वर्ष रेल्वेरूळ ओलांडणे
२०१२ १२६१
२०१३ १२२१
२०१४ ११४८
२०१५ (ऑक्टो.) १०१३
एकूण ४६४३

बुधवारची कामगिरी

स्थानक घटना स्थानक घटना
सीएसटी ३५
कर्जत ३८
दादर २७
डोंबिवली २७
पनवेल २७
ठाणे २६
पनवेल २६
मानखुर्द २२
कल्याण १९
कुर्ला १८
मुलुंड १३