मुंबई: मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या रेल्वे प्रवाशांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यासाठी मुंबई पालिकेकडून मध्य, पश्चिम रेल्वे स्थानक हद्दीत अतिरिक्त ३०० मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मार्शलसोबत गरजेनुसार दोन लोहमार्ग पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
सध्या रेल्वे स्थानकांचे प्रवेशद्वार, पालिका व रेल्वे पादचारी पुलांवरून बाहेर पडण्याचे मार्ग आदी ठिकाणी पालिकेकडून कारवाईसाठी मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत उपनगरीय प्रवासी संख्येत वाढ झाली आहे, तर मुखपट्टीचा वापर न करणाºयांचे प्रमाणही अधिकच आहे. त्या तुलनेत मार्शलची संख्या अपुरीच पडते. मार्शलकडून कारवाई सुरू झाल्यानंतरही मुखपट्टीविना फिरणाºयांचे प्रमाण कमी झालेले नाही. परिणामी कारवाई तीव्र करण्यासाठी पालिकेकडून रेल्वे स्थानक हद्दीत आणखी ३०० मार्शल नियुक्त करण्यात येणार आहेत. हे मार्शलही रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, फलाट, लोकलमध्ये फिरूनही मुखपट्टीविना फिरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करणार आहेत. कारवाई अधिक तीव्रतेने करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, प्रवासी व मार्शलमध्ये वाद होऊ नये यासाठी गरजेनुसार किंवा त्यांच्या विनंतीनुसार लोहमार्ग पोलिसांनी मनुष्यबळ देण्याची तयारी दर्शवली आहे. अतिरिक्त एक महिला व एक पुरुष लोहमार्ग पोलीस प्रत्येक स्थानकात तैनात केले जातील. पश्चिम व मध्य रेल्वेवर एकूण १४४ उपनगरीय स्थानके असून २८८ अतिरिक्त लोहमार्ग पोलीस तैनात होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रेल्वे स्थानक हद्दीत आणखी ३०० मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. त्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यांच्या कारवाईत रेल्वे पोलीसही सहभागी होतील. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका
पालिकेकडून अतिरिक्त मार्शल रेल्वे हद्दीत लवकरच नियुक्त होतील. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्या मागणीनुसार लोहमार्ग पोलीसही सोबत असतील. – प्रदीप चव्हाण, पोलीस उपायुक्त (पश्चिम रेल्वे)
अडथळा आणल्यास कारावास
करोना नियमांचे उल्लंघन केल्यास व मार्शलकडून कारवाई करताना प्रवाशांनी अडथळा आणल्यास एका महिन्याचा साधा कारावास आणि त्यादरम्यान मार्शलला मारहाण केल्यास सहा महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 12:03 am