News Flash

रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्या अनधिकृत दलालांविरुद्ध कारवाई

राज्यात ४६६ गुन्हे दाखल, ४९२ जणांना अटक

(संग्रहित छायाचित्र)

मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या राज्यभरातील अनधिकृत दलालांविरोधात मध्य रेल्वेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी २०२० मध्ये ४६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ४९२ दलालांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पावणेतीन कोटी रुपये किमतीची १४ हजार ३४३ तिकिटे हस्तगत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या आणि विशेष गाडय़ांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवल्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा तिकीट दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे. आरपीएफच्या पथकाने सायबर सेल आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेही टाकले.

* मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, भुसावळ या विभागांत वर्षभरात केलेल्या कारवाईत ४६६ गुन्हे दाखल झाले.

* एकूण १४,३४३ तिकिटे जप्त करण्यात आली असून त्यात १४ हजार ०६५ ई-तिकिटे आणि २७८ तिकीट खिडक्यांवरील तिकिटांचा समावेश आहे.

* ४६६ प्रकरणांपैकी २५३ गुन्हे हे मुंबई विभागात दाखल झालेले असून एक कोटी ४३ लाख रुपये किमतीची सात हजार तिकिटे जप्त करण्यात आली. यामध्ये सहा हजार ८६३ ई-तिकिटे आणि १३९ तिकीट खिडक्यांवरील तिकिटांचा समावेश आहे.

* मुंबई विभागात एकूण २६२ जणांना अटक केली आहे.

विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर..

ई-तिकीट काढण्यासाठी अनधिकृत दलालांकडून विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यामुळे तिकिटे अधिक झटपट काढली जातात. रेल्वे स्थानकातील पीआरएस तिकीट खिडक्या सुरू होताच रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करून काही सेकंदांतच तिकिटे आरक्षित केली जातात. अनेकदा अधिकृत दलालही त्यांना ई-तिकीट काढण्यासाठी दिलेल्या वैयक्तिक आयडीचा गैरपावर करतात. आयआरसीटीसीने दिलेल्या एका विशेष आयडीवरून त्यांना आखून दिलेल्या आरक्षण क्षमतेनुसार जास्त तिकिटे काढतात. त्यांना दिलेल्या निर्धारित वेळेआधीच वैयक्तिक आयडीवरून तिकीट काढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:17 am

Web Title: action against unauthorized brokers selling railway tickets abn 97
Next Stories
1 विदर्भ, मराठवाडा निधीवाटपाचा मुद्दा ऐरणीवर
2 नियम तोडणाऱ्यांविरुद्ध मुंबईत कडक कारवाई
3 सागरी परिषदेत ४७ हजार कोटींच्या सामंजस्य करारांचे उद्दिष्ट
Just Now!
X