अस्वच्छतेच्या नावाखाली नागरिकांना लुबाडल्यास कारवाई

अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याच्या नावाखाली मुंबईकरांना लुबाडणाऱ्या क्लीन-अप मार्शलविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेत पालिकेने या संदर्भातील नियमावलीत सुधारणा केली आहे. मुंबईकरांना विनाकारण त्रास देणाऱ्या क्लीन-अप मार्शलवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर चौथा गुन्हा करणाऱ्या क्लीन अप मार्शलची नियुक्ती करणाऱ्या संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकण्याची तरतूद नियमावलीत करण्यात आली आहे.

मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांना चाप बसावा, ‘सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई’चे स्वप्न वास्तवात उतरावे यासाठी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार क्लीन अप मार्शलना देण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी क्लीन अप मार्शल विनाकारण नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी नागरिक आणि क्लीन अप मार्शल यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी उडत असून काही ठिकाणी उभयतांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत पालिकेने क्लीन अप मार्शलविषयीच्या नियमावलीमध्ये दुरुस्ती केली आहे.

भविष्यात नागरिकांना अकारण त्रास देणाऱ्या क्लीन अप मार्शलवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी क्लीन अप मार्शलची तक्रार केल्यानंतर प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन शहानिशा करण्यात येणार आहे. क्लीन अप मार्शलविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीतील आरोप सिद्ध झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अनामत रक्कम जप्त

दोषी आढळणाऱ्या क्लीन अप मार्शलवर पहिल्या गुन्ह्य़ासाठी १० हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्य़ासाठी २० हजार रुपये, तिसऱ्या गुन्ह्य़ासाठी ३० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याच क्लीन अप मार्शलकडून चौथा गुन्हा घडल्यास त्याची नियुक्ती करणाऱ्या संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येणार असून क्लीन अप मार्शलच्या नियुक्तीसाठी भरण्यात आलेली पाच लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे. क्लीन अप मार्शलबाबतच्या नियमावलीत प्रशासनाने वरील सुधारणा केली आहे. त्यामुळे क्लीन अप मार्शलकडून होणाऱ्या मुंबईकरांची लूट रोखली जाईल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.