वरळीत जी दक्षिण विभागाची कारवाई

मुंबई : झाडांवर, खांबांच्या साहाय्याने लोंबकणाऱ्या आणि शहर विद्रूप करणाऱ्या वाहिन्या पालिकेने हटवल्या आहेत. जी दक्षिण विभागाने घेतलेल्या मोहिमेअंतर्गत या वाहिन्या काढून टाकण्यात आल्या आहेत.  या कापलेल्या वाहिन्यांची एकत्रित लांबी जवळपास दीड किमी इतकी मोजली  गेली.

मुंबईमध्ये जिओ, टाटा टेली सव्‍‌र्हिस, व्होडाफोन, टाटा पॉवर, बेस्ट, एअरटेल, डीजी केबल, महानगर गॅस अशा विविध २० प्रकारच्या उपयोगिता वाहिन्या मुंबईत जमिनीच्या खालून टाकल्या जातात. त्याकरिता पालिकेची रीतसर परवानगी घेऊन रस्त्यावर चर खणून या वाहिन्या टाकल्या जातात. मात्र काही कंपन्या पैसे वाचवण्यासाठी आपल्या वाहिन्या अनधिकृतपणे झाडांवर, रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावर टाकतात. अशा अनधिकृत वाहिन्यांचे जाळेच मुंबईत अनेक ठिकाणी विणलेले दिसते. अशा लोंबकळणाऱ्या वाहिन्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच एखाद्या परिसरात आग लागल्यास बचावकार्यासाठी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही अडथळे येतात. त्यामुळे जी दक्षिण विभागाने वरळी, प्रभादेवी परिसरातून या वाहिन्या हटवण्याची मोहीमच हाती घेतली होती.

पालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या पथकाने पांडुरंग बुधकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, अ‍ॅनी बेझंट मार्ग अशा सुमारे दहा-बारा मार्गावरील वाहिन्या कापून खाली उतरवल्या आहेत. या सगळ्या मार्गावरून मिळून तब्बल १२०० मीटर लांबीच्या वाहिन्या हटवण्यात आल्या असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

वाहिन्या टाकणाऱ्या सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना जी दक्षिण विभागाने जानेवारी महिन्यात नोटीस पाठवून त्या हटवण्याची विनंती केली होती. मात्र त्याची कोणत्याही कंपनीने दखल न घेतल्याने अखेर पालिकेच्या पथकाने कारवाई करून या वाहिन्या हटवल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

उपयोगिता वाहिन्या टाकण्यासंदर्भात पालिकेची नियमावली असून त्याचे पालन करणे या कंपन्यांना बंधनकारक आहे. या केबल्स टाकण्याकरिता पालिकेची परवानगी घेणे व त्याकरिता शुल्क भरणे बंधनकारक आहे. केवळ आपत्कालीन परिस्थितीतच वरून वाहिन्या टाकण्याची परवानगी दिली जाते. – शरद उघडे, साहाय्यक आयुक्त, ‘जी’ दक्षिण विभाग