News Flash

उदंड जाहले फेरीवाले

भाऊबीजेच्या दिवशी रेल्वे स्थानक व हद्दीत एकाही फेरीवाल्याचा वावर नव्हता,

फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असल्याचा दावा पालिका व रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे

मध्य रेल्वेवर महिन्याला जवळपास ५०० फेरीवाल्यांवर कारवाई

रेल्वे स्थानकांबरोबरच लोकल, लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये फेरीवाल्यांचा वावर आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप पाहता रेल्वेकडून त्यांच्याविरोधात कारवाई केल्याचा दावा केला जातो. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात (मुंबई ते रोहा, लोणावळा, इगतपुरीपर्यंत) केलेल्या कारवाईत १६ हजार ७३१ जणांवर कारवाई करण्यात आली. सप्टेंबर २०१७ पर्यंत आणखी ६ हजार १३२ प्रकरणांची भर पडली आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर फेरीवाल्यांमुळे होणारी रेल्वे स्थानकातील गर्दीचा मुद्दा समोर आला. त्यांनतर मनसेकडूनही फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात यावी आणि त्यासाठी १५ दिवसांची मुदतही दिली. त्यामुळे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून फेरीवाल्यांना हटवण्यात आले असले तरी स्थानकातील प्रवेशद्वार  आणि स्थानकांच्या बाहेरच फेरीवाले बसण्याचा प्रयत्न करत आहेत. या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असल्याचा दावा पालिका व रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र दोन वर्षांत मध्य रेल्वेने केलेल्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाई पाहिल्यास फेरीवाल्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबई विभागात जानेवारी ते सप्टेंबर २०१७ पर्यंत केलेल्या कारवाईत २२ हजार ८६३ केसेस करण्यात आल्या आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०१६ मध्ये हाच आकडा १६ हजार ७३१ एवढा होता. या केसची संख्या पाहिल्यास फेरीवाल्यांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

* २०१६ मध्ये ६१ लाख २४ हजार ८२३ रुपये दंड, तर २०१७ मध्ये १ कोटी १३ लाख ८९ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला.

* भाऊबीजेच्या दिवशी रेल्वे स्थानक व हद्दीत एकाही फेरीवाल्याचा वावर नव्हता, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्यानेच फेरीवाल्यांचा वावर आता होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

* २०१६ मध्ये १०२ फेरीवाल्यांना कारावास भोगावा लागली होता. तर २०१७ मध्ये हाच आकडा वाढलेला दिसतो. या वर्षी ५०९ जणांना अटक करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

* रेल्वे पादचारी पूल, रेल्वे फलाट, स्थानक प्रवेशद्वार, लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. दोन वर्षांत मोठय़ा संख्येने कारवाई झाली. ही कारवाईदेखील सुरू राहील.

– सुनील उदासी ,मध्य रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2017 4:50 am

Web Title: action on 500 hawkers on central railway in a month
टॅग : Hawkers
Next Stories
1 मेट्रोचा विस्तार कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदरपर्यंत
2 दारिद्रय़रेषेखालील मुलांवर मोफत दंतोपचार
3 विमानतळाच्या उभारणीचा मुहूर्त सापडला
Just Now!
X