खोटी माहिती देऊन नवी मुंबईतील साडेबारा टक्के योजनेतील भूखंड हडप करणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

या संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. श्री. डोसु अधेसीर भिवंडीवाला व मे. अथर्व डेव्हलपर्स यांनी सिडकोची फसवणूक करून साडे बारा टक्के योजनेतील नवी मुंबईतील आंबेडटखार, सेक्टर ४ व २० येथील १६ हजार २०० चौ. मी.चा भूखंड हडप केला. त्यावर इमारती बांधून सदनिका विकण्यास सुरुवात केली. २०१३ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला, परंतु संबंधित विकासकावर डिसेंबर २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विकासकाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप काहीही कारवाई झाली नाही, असे मुंडे यांनी निदर्शनास आणले. नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी त्यावर सांगितले की, साडे बारा टक्के ही योजना वैयक्तिक आहे, एखाद्या संस्थेला त्याचा लाभ दिला जात नाही. असे असताना हा भूखंड ट्रस्टच्या मालकीचा दाखविण्यात आला. भिवंडीवालाने सिडकोला खोटी माहिती देऊन हा प्रकार केल्याचे २०१२-१३ मध्ये उघडकीस आले. त्याच्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे