वसई विरार आयुक्तालयाच्या विशेष पथकाने नालासोपारा येथे एका बोगस अमेरिकन कॉल सेंटरवर कारवाई करत ९ पुरुष आणि ३ महिलांना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात नालासोपारा पोलीस ठ्ण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीदाराच्या आधारे पोलिसांना नालासोपारा श्रीप्रस्था यशवंत गौरव परिसरात एक बोगस अमेरिकन कॉल सेंटर चालत असल्याची  माहिती मिळाली होती.  या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री कारवाई केली. यात पोलिसांनी ९ लॅपटॉप, १० मोबाईल आणि वाय फाय रॉटार जप्त केले.

बेसिन एक्सपोर्ट लिमिटेड नावाने हे कॉल सेंटर चालत होते. यामध्ये अमिरिकेत राहणाऱ्या नागरिकांची माहिती मिळवून त्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर वेगवेगळ्या अनैतिक घडामोडी होत आहेत असे सांगून फसवले जात होते. त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल असे सांगून क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळत जात होते. अशा प्रकारे त्यांनी हजारो नागरिकांना गंडा घातला गेला असल्याची माहिती वसई विरार पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली आहे. यातील तीन महिलांना नोटीस बजावून सोडण्यात आले असून इतर नऊ जणांना अटक केली आहे.